कलाकारांचे पैसे बुडवले, काम करूनही, पाठपुरावा करूनही आपल्याला कामाचे पैसे दिले जात नाहीत अशी ओरड मराठी सृष्टीत अनेकदा पाहायला मिळते. शशांक केतकरने तर काही दिवसांपूर्वीच पुन्हा एकदा आपली फसवणूक झाली असल्याचे उघडकीस आणले होते. हे मन बावरे या मालिकेचे लाखो रुपये मला मिळाले नाहीत असे शशांकने म्हटले होते. पण त्यानंतरही एका चित्रपट निर्मात्याने माझे पैसे थकवले आहेत असे म्हटले आहे. शशांक पाठोपाठ गौतमी देशपांडे हिने देखील आपल्याला कामाचे पैसे मिळाले नाहीत असे एका पोस्टद्वारे म्हटले होते.
आता प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी यांनीही याबाबत नुकताच एक खुलासा केला आहे. मिलिंद गवळी हे बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात काम करत होते. त्यांनी मराठी सृष्टीत नायक म्हणून एक काळ गाजवला तर हिंदीतही त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या. या क्षेत्रात इतके वर्षे काम केल्यानंतर अनेक चांगले वाईट अनुभव कलाकारांना येत असतात. आपल्या स्ट्रगलच्या काळात तर तुटपुंज्या मानधनावर कलाकारांना काम करावे लागते. मिलिंद गवळी यांनीही अशी बरीच कामं केली पण काही कामाचे त्यांना पैसे देखील मिळाले नाहीत. सध्या आई कुठे काय करते मालिकेतून ते मालिका सृष्टीत स्थिरस्थावर झाले आहेत. मुंबईत घर घेणं ही सोपी गोष्ट नाही असे त्यांनी म्हटले आहे. मिलिंद गवळी याबाबत सांगतात की, मी एक कलाकार आहे, पण तरीही मला कामासाठी धडपड करावीच लागते.
पुढे ते असेही म्हणतात की, मुंबईत घर घेणं सोपी गोष्ट नाही. मी इतक्या वर्षांनी मुंबईत घर घेतलं पण आजही मी या घराचे हप्ते भरत आहे. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीत माझे बरेच पैसे अडकून होते. आणि आजपर्यंत ते मला मिळालेले नाहीत. काहींनी मुद्दामहून दिले नाहीत तर काहींना तोटा सहन करावा लागल्याने त्यांना ते देणे जमले नाही. पण मीही त्यांच्याजवळ ते पैसे कधी मागितले नाहीत. कलाकारांना मालिकेत, चित्रपटात काम करताना तासनतास शूटिंग करावे लागत असते. आपल्याच कामाचे पैसे मिळवण्यासाठी त्यांना अनेकदा विनंती सुद्धा करावी लागते. हे क्षेत्र बेभरवशाचे आहे हे ठाऊक असूनही काम मिळवण्यासाठी कलाकारांना स्ट्रगल करावा लागतो. यातून काम मिळालेच तर त्या कामाचे पैसे तुम्हाला मिळतील की नाही याचीही शाश्वती मिळत नाही. हा अनुभव मोठमोठ्या कलाकारांनीही घेतलेला आहे.