गायन आणि अभिनय ही दोन्हीही क्षेत्र वेगवेगळी असली तरी या दोन्ही क्षेत्रात वावरण्याचे धाडस आजपर्यंत अनेक कलाकारांनी केलेले पाहायला मिळाले आहे. बॉलिवूड सृष्टीत तर या गोष्टी सर्रासपणे पाहायला मिळतात. मराठी सृष्टीला गेल्या तीन पिढ्यांपासून गायन क्षेत्राचा वारसा लाभलेले कुटुंब म्हणजे शिंदे कुटुंब. प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे यांच्या नंतर आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे पेशाने डॉक्टर असला तरी गायन क्षेत्रातही तो बिनधास्तपणे वावरताना दिसला आहे. मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनमुळे लोकप्रियता मिळवल्यानंतर उत्कर्षने व्हिडीओ सॉंगमधून काम केले आहे. परंतु लवकरच त्याचे छोट्या पडद्यावर देखील आगमन होत आहे.
सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत संत चोखामेळा यांची एन्ट्री होत आहे. ही भूमिका उत्कर्ष शिंदे निभावताना दिसणार आहे. मालिकेतील या भूमिकेसाठी असणारा उत्कर्षचा लूक नुकताच समोर आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत चोखामेळा यांची भेट कशी घडून येते हे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे. ज्ञानेश्वर माऊली मालिकेतून माऊलींच्या सानिध्यात आलेल्या सर्व संतांची ओळख करून देण्यात येत आहे. या व्यक्तिरेखांवर आजवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. संत चोखामेळा ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल उत्कर्ष खूपच खुश आहे. ही व्यक्तिरेखा साकारताना पहिल्यांदा मनात काय आले याबद्दल उत्कर्ष व्यक्त झाला आहे.
उत्कर्ष म्हणतो की, ज्ञानेश्वर माऊली सोनी मराठी वर येत असलेल्या ह्या लोकप्रिय मालिकेत. माझ्या गावचे मंगळवेढ्याचे थोर संत चोखामेळा ज्यांच्यामुळे आम्हावर अभंगांचे, भक्ती गीतांचे संस्कार झाले. त्या थोर संत चोखामेळा ह्यांची भूमिका, व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न मी करतोय. पूर्वजांनी काय सहन केलं, कसे भक्ती रस अभंग, भक्ती गीते जन्मास घातले. त्या हाल अपेष्ठा तरीही निःसीम भक्तीचे चित्र म्हणजे संत चोखामेळा. त्यांची भूमिका मी करतोय ह्यापेक्षा आनंदाचा क्षण आणखीन काय असेल. मंगळवेढे भूमी संतांची. उत्कर्षच्या या यशाबद्दल कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.