बॉलिवूड आणि मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणारी अभिनेत्री असून देखील रिक्षा चालवते? शक्यच नाही, काहीही काय सांगता राव ! हिरोईनने आलिशान गाडीतून फिरावे, भरमसाठ पैसे कामविणारी अभिनेत्री स्वतः रिक्षा चालवून सेटवर येते असं कुठं असतंय का.. यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड असले तरी हे अगदी खरे आहे. हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिका करून देखील थाटामाटात वावरण्याचा हा टॅग एका मराठमोळ्या अभिनेत्रीने पुसून काढला आहे. आपल्या सहकलाकारांनी कितीही नावे ठेऊ देत पण आपल्या निर्णयावर ठाम असलेली ही अभिनेत्री याच कारणामुळे सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवत आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीचे नाव आहे यशश्री मासुरकर.
यशश्रीने नुकताच कबाड़ द कॉइन या चित्रपटात सविताची प्रमुख भूमिका केली आहे, यासोबतच ऐतिहासिक फिक्शन टेलिव्हिजन शो चंद्रगुप्त मौर्य, देवसेना वर आधारित काल्पनिक सीरिअल आरंभ आणि लाल इश्क मालिकेमध्ये सुपरस्टार स्वप्नील जोशी सोबत मुख्य भूमिका साकारण्याची तिला संधी मिळाली होती. या शिवाय दो दिल बंधे एक डोरी से, रंग बदलती ओढनी या सारखे डेली सोप तिने केले आहेत. सुप्रसिद्ध अभिनेता कुणाल खेमू सोबत अभय नावाची वेब सिरीज देखील तिने केली आहे. यशश्री रेडिओ जॉकी आरजे देखील आहे. आपली कारकीर्द शिखरावर पोहोचत असतानाच तिने आपली कार विकून चक्क रिक्षा खरेदी केली होती. ती एवढ्यावरच थांबली नाही तर स्वतः रिक्षा चालवून ती शूटिंग सेटवर पोहोचू लागली. यावरून तिच्या सह कलाकारांनी तिचे कौतुकही केले, काही जणांनी पाठमोरे झाल्यावर नावे देखील ठेवली. पण यासर्वांचा तिच्यावर कुठलाच परिणाम झाला नाही.
याबाबत यशश्रीने खुलासा केला की, “मी कार विकून रिक्षा घेण्यामागे एक खास कारण होते. परदेशातला एक मित्र भारतात फिरायला आला होता त्यामुळे आपली कार विकून रिक्षा खरेदी केली होती. त्यानंतर या रिक्षाचे काय करायचे म्हणून ही रिक्षा स्वतः वापरण्याचे ठरवले. यामुळे माझा वेळ आणि पैसा दोन्हीतही बचत होते. ड्रायव्हर ठेवणे त्याला पगार देणे शिवाय त्याने सुट्टी घेतल्यावर येणारी अडचण ह्या बाजू लक्षात घेऊन ती रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. ह्यामुळे तिला समाजातील गोर गरीब लोकांमध्ये फिरायला मिळते, त्यांच्याकडून लहान सहान गोष्टी शिकायला मिळतात.” गोर गरीब मुलांसोबत ती अनेकदा फिरताना दिसते इतकेच काय तर मुलांना शाळेत देखील सोडते. कदाचित कार असती तर तिला असं मनसोक्त जगता आले नसते, ह्यात एक वेगळाच आनंद मिळतो असे तिचे म्हणणे आहे. तिच्या याच धाडसामुळे सोशल मीडियावर ती कायम चर्चेत राहिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे लहान गरीब मुलांना ती मोफत रिक्षातुन सोडते. स्वतःला जे आवडते तेच तिने केले लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा ते खूप महत्वाचं आहे, अश्या अष्टपैलू मराठमोळ्या यशश्री मासुरकर हिला मानाचा मुजरा.