आजपासून झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. कॉलेजमध्ये मैत्री असलेली अनामिका आणि सौरभ यांची कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा भेट घडून येते. अनामिका ही इंटेरिअर डिझायनर आहे तर सौरभ त्याच्या कामानिमित्त मुंबईला गेलेला असतो. इथेच या दोघांची भेट घडून येते. आपले काम आटोपून हे दोघेही अनामिकाच्या गाडीने पुण्याला येतात. त्यावेळी सौरभने त्याच्या वहिनीसाठी घेतलेलं गिफ्ट अनामिकाच्या गाडीत विसरतो. यामुळे या दोघांची पुन्हा एकदा भेट घडून येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा भावे, अभिषेक रहाळकर, सुनील गोडबोले आणि सुहास जोशी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. अभिषेक सौरभच्या धाकट्या भावाच्या भूमिकेत दिसत आहे तर अभिज्ञा वहिनीची भूमिका साकारत आहे.
अभिज्ञा भावे या मालिकेतून पुन्हा एकदा विरोधी भूमिका साकारताना दिसत आहे. तूर्तास तू तेव्हा तशी या मालिकेत प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर यांच्या मुलीची एन्ट्री झाली आहे. प्रदीप वेलणकर यांची मुलगी म्हणजेच मीरा वेलणकर तू तेव्हा तशी या नव्या मालिकेतून चित्रलेखाचे पात्र साकारताना दिसत आहे. चित्रलेखाची भूमिका ही अनामिकाच्या भूमिकेसारखी दिलखुलास भूमिका आहे. महिलांची बाजू घेणारी आणि त्यांना मदत करणारी चित्रलेखा मीराने सुरेख निभावली आहे. मीरा वेलणकर ही चित्रपट दिग्दर्शिका आहे. झी मराठीवरील बंधन या मालिकेतून मिराने महत्वाचे पात्र साकारले होते. या मालिकेनंतर मीरा दिग्दर्शन क्षेत्राकडे वळली. जाहिराती आणि चित्रपटांचे दिग्दर्शन तिने केले असून सुरुवातीला जाहिरातींमध्ये देखील ती झळकली आहे.
मीरा वेलणकरने विजय सावंत यांच्या सोबत लग्नगाठ बांधली. मीराची बहीण ही देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मधुरा आणि मीरा या दोघी बहिणी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कला क्षेत्रात दाखल झाल्या. मधुरा वेलणकरने अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण केली तर मीराने अभिनय तसेच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले. बऱ्याच वर्षानंतर मीरा मालिकेतून अभिनय क्षेत्रात उतरत आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत ती चित्रलेखाचे विशेष पात्र साकारत आहे. चित्रलेखाचे या सर्वांशी नाते काय आणि तिची नेमकी काय भूमिका आहे हे मालिकेतून लवकरच उलगडेल. या नव्या मालिकेतील पुनरागमनासाठी मीरा वेलणकर हिचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा.