झी मराठी वाहिनीवर तू तेव्हा तशी ही नवी मालिका प्रसारित केली जात आहे. मालिकेतून अनामिका आणि सौरभच्या राहून गेलेल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. अवघ्या आठवड्याभरातच या मालिकेतील कलाकारांनी मात्र प्रेक्षकांची मने जिंकून घेतलेली पाहायला मिळत आहेत. शिल्पा तुळसकर, स्वप्नील जोशी, अभिषेक रहाळकर, अभिज्ञा भावे, सुनील गोडबोले, उज्वला जोग, सुहास जोशी आणि मीरा वेलणकर या कसलेल्या कलाकारांसोबत. रुमानी खरे, विकास वर्मा हे नवखे कलाकार मालिकेतून सजग अभिनयाचे रंग भरताना पाहायला मिळत आहेत. मालिकेच्या पहिल्याच एपिसोडमध्ये अनामिका आणि तिचा कॉलेजचा मित्र चंदू चिमणेची भेट घडते.
चंदू चिमणे ना तू! काय रे चिमण्या काय केलंस हे शरीराचं. असे म्हणत अनामिका चंदूला परत भेटू म्हणून त्याचा निरोप घेऊन निघून जाते. मालिकेतला हा चंदू विनोदी भूमिका साकारताना पाहायला मिळत आहे. मात्र हा चंदू नक्की आहे तरी कोण असा प्रश्न बहुतेकांना पडला असावा. कारण ह्याच चांदूला तुम्ही याअगोदर झी मराठी आणि इतर मराठी वाहिन्यांवरील मालिकेतून पाहिलेले आहे. आज या चंदुबद्दल माहीत नसलेल्या काही खास गोष्टी आपण जाणून घेऊयात. मालिकेत सौरभ पटवर्धन आणि अनामिका दीक्षित यांच्या वर्गमित्राची भूमिका साकारली आहे अभिनेता किरण भालेराव याने. किरण भालेराव हा मूळचा नाशिकचा, पेठे हायस्कुल आणि बी वाय के कॉलेज मधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. याखेरीज बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षणही त्याने घेतले.
कॉलेजमध्ये असल्यापासूनच किरण भालेराव नाटकांमध्ये काम करत असे. पुढे पोटापाण्यासाठी बँकेत नोकरी केली मात्र नोकरीमध्ये फारसे मन रमले नाही. नाटकात काम करण्याची ईच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. त्यासाठी वारंवार सुट्ट्या घ्याव्या लागायच्या. एकदा असेच आज्जीचे निधन झाले असल्याचे कारण सांगून रजा मिळवली होती. मात्र आपलं कारण खोटं आहे हे बॉसच्या लक्ष्यात आलं होतं. एकदा एका प्रोजेक्टसाठी अशीच एक ऑडिशन दिली होती. त्यावेळी पुढच्या प्रोसेस साठी अमरावतीला बोलावले होते. मात्र आता रजेसाठी कुठले कारण द्यायचे हा मोठा प्रश्न समोर उभा होता. शेवटी बँकेच्या नोकरीला रामराम ठोकून पूर्ण वेळ अभिनयाला देण्याचा त्याने निर्णय घेतला. २००९ साली झी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये पार्टिसिपेट केले.
या शोमुळे किरणला अमाप प्रसिद्धी मिळाली. विनोदाचे अचूक टायमिंग आणि आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया या मालिकेत किरणला नंदी महाराजांची भूमिका मिळाली. त्याने साकारलेला नंदी महाराज प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. झी मराठीच्याच बाजी या आणखी एका मालिकेतून तो खंडेराव सरदारची तगडी भूमिका साकारताना दिसला. स्टार प्रवाहवरील जिवलगा, सोनी सबवरील मंगलम दंगलम अशा अनेक मालिकेतून त्याने विविधांगी भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या. तू तेव्हा तशी या मालिकेतून किरण पुन्हा एकदा झी मराठी वाहिनीवर झळकताना दिसत आहे. या मालिकेतून तो चंदू चिमणेचे पात्र साकारत आहे. या भूमिकेसाठी किरण भालेरावचे अभिनंदन आणि पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!