द कश्मीर फाईल्स चित्रपट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल भरभरून बोलले जात असल्याने हा ट्रेंड नंबर १ एक वर येऊन पोहोचला आहे. विवेक अग्निहोत्री यांना हा चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली ती सुरेंद्र कौल यांच्याकडून. अमेरिकेत ह्युस्टन येथे कश्मीर पंडित समुदायाचे सुरेंद्र कौल आणि विवेक अग्निहोत्री यांची भेट झाली. आमच्यावर झालेल्या या अत्याचाराचे सत्य इमानदारीने लोकांपर्यंत पोहोचावे अशी त्यांची ईच्छा होती. याच विचाराने विवेक अग्निहोत्री यांनी पत्नी पल्लवी जोशी सोबत चर्चा केली. देशाचे सैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सर्वांचे रक्षण करतात. मग आपणही आपल्या कलेचा उपयोग करून देशसेवा करावी या हेतूने चित्रपट बनवण्याचा निश्चय केला.
चार वर्षांपूर्वी भरपूर मेहनत घेऊन, अभ्यास करून हा चित्रपट करण्यास सुरुवात केली. अनेक विरोध अडचणींवर मात करत अखेर ११ मार्च २०२२ रोजी द कश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या ३ दिवसांपासून प्रेक्षकांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हीच आपल्या चित्रपटाच्या खऱ्या यशाची पावती ठरली आहे असे विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. दरम्यान चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांनी उर्स्फुतपणे बोलण्यास सुरुवात केली आहे. सत्य काय आहे हे चित्रपट पाहिल्यानंतर आम्हाला समजले अशी अनेकांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर हा चित्रपट डोळे उघडवणारा आहे असे म्हटले आहे. चित्रपटात मन सुन्न करणाऱ्या अनेक घटना दाखवण्यात आल्या आहेत. शेजारी राहणारेच लोकं असं काही करू शकतील याची कल्पनाही करवत नाही.
अशा अनेक प्रतिक्रिया देताना प्रेक्षक भावनिक झालेले पाहायला मिळाले. भारताचा अविभाज्य घटक असलेल्या जम्मू कश्मीर जनतेने देखील या चित्रपटाविषयी भरभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे आणि तो तुमचा आहे यातून सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेटर सुरेश रैना यानेही दिलेली पाहायला मिळते आहे. जगभरातून द कश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल बोलण्यास सुरुवात झाली आहे. भारतीयांसोबतच परदेशी प्रेक्षकांनीही मन विषन्न करणाऱ्या घटनां विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. त्यामुळे जगभरातील सिनेमागृहात हा चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहे.
शुक्रवारी पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४.२५ कोटींचा गल्ला मिळवला होता. शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्या दिवशी १०.१० करोड आणि तिसऱ्या दिवशी १७.२५ करोडपर्यंत या चित्रपटाने मजल मारलेली पाहायला मिळाली. अवघ्या तीन दिवसातच चित्रपटाने ३१.६० कोटींचा पल्ला गाठलेला पाहायला मिळतो आहे. नुकतेच विवेक अग्निहोत्री यांनी या ऐतिहासिक घटनेबद्दल खुलासा करत म्हटले आहे की, ३२ वर्षांत प्रथमच असं घडतंय की ज्याला संयुक्त राज्य अमेरिकेतील लोकतांत्रिक आणि उदार राज्य रोड आइलैंडने एका छोट्याशा चित्रपटासाठी कश्मीर मध्ये नरसंहार झाल्याचे मान्य केले आहे.