स्वराज्य सौदामिनी ताराराणी ऐतिहासिक मालिका सोनी वाहिनीवर सुरु झाली आहे. अभिनेत्री स्वरदा थिगळे ताराराणी यांच्या प्रमुख भूमिकेत अप्रतिम अभिनयाची चुणूक दाखवित आहे. स्वरदाची ही पहिलीच ऐतिहासिक भूमिका असल्याने तिच्यासाठी हे बिलकुल सोपे नव्हते. रणरागिणी ताराराणींची भूमिका साकारताना आलेली आव्हाने, मालिकेसाठीची केलेली तयारी नुकत्याच एका मुलाखतीत तिने व्यक्त केली आहेत.
ताराराणी या मुख्य भूमिकेविषयी बोलताना स्वरदा म्हणाली, “ताराराणीच्या भूमिकेसाठी तब्बल ४०० अभिनेत्रींनी ऑडिशन दिले होते. यामध्ये सर्वात शेवटी माझी ऑडिशन झाली, त्यात निर्मात्यांनी माझ्यामध्ये कोणते कलागुण पारखले हे सांगणे माझ्यासाठी फार कठीण आहे. अभिनयासोबतच मला घोडेस्वारी आणि थोडीफार तलवार बाजी माहित होती. राज्य आणि राष्ट्रीय स्तरीय जलतरणपटू असल्याने मूळची चपळता माझ्या अंगी आहे. शास्त्रीय नृत्य आणि अभिनयातील चांगला अनुभव यामुळे या भूमिकेसाठी माझी निवड होईल असा मला आत्मविश्वास होता.” छत्रपती ताराराणी यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावरील भूमिका साकारणे सोपे नव्हते, यासाठी तिने भरपूर अभ्यास सुरु केला. अनेक पुस्तक आणि संदर्भ ग्रंथांचे वाचन केले. संशोधन करत असताना त्याकाळच्या बोलल्या जाणाऱ्या शब्दांवरही काम केले. मालिकेतील संवाद किचकट आणि एकसलग असल्याने त्याचा खास सराव तिने केला आहे. श्रोत्यांपर्यंत हे अभिनयासह एका दमात पोहोचवणे हे तिच्या समोरील खरे आव्हान असणार आहे. मालिकेत ताराराणीच्या वेषभूषा, अलंकार, सेट आणि पार्श्वसंगीत संदर्भात तसेच एकंदरीत लहान मोठ्या तपशीलांवर विशेष काम केल्याचे जाणवते, ज्यावरून मालिकेचे भव्य स्वरूप सहज लक्षात येते.
ताराराणीची भूमिका करताना स्वरदाला आलेल्या आव्हानांविषयी सांगताना ती म्हणाली, “ताराराणी ही छत्रपती शिवाजी महाराजांची सून आहे, छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी तर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या देखील आहे. त्यामुळे पडद्यावर सशक्त व्यक्तिमत्त्व असलेली ही भूमिका साकारणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. तसेच ताराराणी ही एकमेव राणी होती जिने मुघलांशी लढा दिला, त्यामुळे माझ्यासाठी ती खरी परीक्षा होती.” छत्रपती राजाराम महाराजांच्या पश्चात स्वराज्याची धुरा खंबीरपणे सांभाळणाऱ्या ताराराणींच्या नेतृत्वावर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या अपेक्षांना पात्र ठरताना दिसत आहे.