हिंदी चित्रपट सृष्टीत नाव लौकिक मिळवलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी सोनाली बेंद्रे हे नाव आवर्जून घ्यावे लागेल. सोनाली बेंद्रे हिने ९० च्या दशकात बॉलिवूडची नायिका बनण्याचा मान पटकावला. खरं तर सोनाली कधी या क्षेत्रात येईल असे तिला अजिबातच वाटले नव्हते. घरच्यांचा तर या क्षेत्राला कडाडून विरोध होता. मात्र हट्टी स्वभावाच्या सोनालीने त्यांना तीन वर्षांचा वेळ मागितला. या तीन वर्षात मी कॉलेजसुद्धा करेन आणि पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेचीही तयारी करेन असे आश्वासन दिले होते. तिचा हा प्रवास नेमका कसा घडला हे तिने एका मुलाखतीत सांगितले आहे. सोनालीचा जन्म झाला तो एका सर्वसाधारण मराठी कुटुंबात.
तिघी बहिणींमध्ये सोनाली मधली होती. घरात अगदी शिस्तीचं वातावरण होतं. सोनाली म्हणते की, आमच्या घरी टीव्ही नव्हता, पूस्तकं आणि वर्तमानपत्र एवढंच वाचायला मिळायचं. आजोळी जेव्हा कधी गावी जायचो तेव्हा मावशीने एक दोन चित्रपट आम्हाला दाखवले होते. तेवढाच आमचा चित्रपटाशी संबंध. पुढे रुईया कॉलेजमध्ये असताना कॉलेजमध्ये रॅम्पवॉक आयोजित व्हायचं हे त्यावेळी कळलं.एकेदिवशी त्या रॅम्पवॉक करणाऱ्या मुलीच्या पायाला दुखावत झाली म्हणून मी ते रॅम्प वॉक केलं त्याला फर्स्ट प्राईस मिळालं. त्यानंतर एक जाहिरात मिळाली. पण या क्षेत्रात येण्यासाठी मला आईवडिलांची परवानगी घ्यावी लागली. कारण घरात साधं आरशासमोर जरी उभं राहिलं तरी डोक्यात टपली मिळायची. बाहेरील सौंदर्यापेक्षा अंतर्मनातील सौंदर्य महत्वाचं असं आमची आई नेहमी सांगायची.
रॅम्पवॉक केल्यानंतर मला पहिली जाहिरात मिळाली. मला आयब्रो करायच्या असतात हेही माहीत नव्हतं. गौतम राजाध्यक्ष आणि मिकी यांनी ते जाहिरतीच फोटोशूट केलं होतं तेव्हा मिकीनेच माझे आयब्रो करून दिले होते. ही गोष्ट आम्ही आजही आठवली की खूप हसतो. त्यावेळी मोठ्या बहिणीला एअर होस्टेस बनायचं होत पण त्याला घरातून नकार होता. मी फार हट्टी होते, ताईचं खूप कमी वयात लग्न झालं पण यातूनच मी सुद्धा पुढे शिकू शकले. मला ऑफर्स येऊ लागल्या तेव्हा आजीने आईला एक सल्ला दिला, तुला तुझ्या संस्कारांवर विश्वास नाही का? तिच्या मध्ये काहीतरी आहे म्हणूनच तिला ऑफर येतात असे आजीने म्हटले होते. त्यानंतरही मी कॉलेजपण करेन असे आश्वासन दिले तेव्हा घरातून परवानगी देण्यात आली.
आमच्याकडे फोन नव्हता, ऑडिशन देण्यासाठी मी माझ्या बहिणीच्या सासरचा फोन नंबर दिला होता. तेव्हा तिची सासू मला हे हे काम आलंय असं लिहून ठेवू लागली त्यानंतर मी ऑडिशन द्यायला जाऊ लागले. नाराज ही पहिली हिंदी फिल्म केली पण गोविंदा सोबतची आग ही फिल्म त्याच्या अगोदर रोलीज झाली. घरातून अभिनय क्षेत्राला विरोध होता त्यामुळे नाच येणं ही तर माझ्यासाठी खूप लांबची गोष्ट होती. सरोज खानने तर माझा डान्स पाहून हिला कोणी निवडलं? महिनाभर माझ्यासमोर येऊ नकोस असे म्हटले होते. त्यानंतर मी एक महिना डान्सची प्रॅक्टिस केली होती.