झी मराठी वाहिनीने आजवर अनेक मालिका, रिऍलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. त्यातील काही मालिकांना आणि शोजना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. अशातच आता नवनवीन काहीतरी घेऊन येण्यासाठी झी मराठी वाहिनीने कंबर कसली आहे. त्यासाठी झी मराठीचा एक शो प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा शो म्हणजेच अवधूत गुप्तेचा खुपते तिथे गुप्ते. झी मराठी वाहिनीने या शोचे दोन पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आणले होते.

दोन्ही पर्वात मराठी सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या आवडत्या कलाकाराला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक एपिसोडची आतुरतेने वाट पाहून होते. पण शोमध्ये राजकारणी मंडळी आलेले पाहून प्रेक्षकांनी थोडीशी नाराजी दर्शवली होती. अगदी देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, संजय राऊत, नितीन गडकरी सारखे मोठमोठे राजकारणी या मंचावर बोलते झाले. पण त्यानंतर मात्र अभिजित बिचुकले सारख्या व्यक्तीला बोलावून अवधुत गुप्तेने त्याच्या शोचा दर्जा घालवला अशी टीका होऊ लागली. पण आता सुप्रिया सुळे यांच्या एका एपिसोड नंतर आणखी एक एपिसोड टेलिकास्ट केला जाणार आहे. त्यानंतर हा शो तूर्तास तरी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

आज या शोच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पार पडत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा निश्वास टाकला आहे. खरं तर खुपते तिथे गुप्ते या शोला चांगला टीआरपी मिळत होता. पण अवधूत गुप्ते लवकरच कलर्स वाहिनीच्या प्रोजेक्टचा भाग बनणार आहे. त्यामुळे नाईलाजास्तव खुपते तिथे गुप्तेला एक्झिट करावी लागत आहे. येत्या ७ ऑक्टोबर पासून कलर्स मराठी वाहिनीवर सूर नवा ध्यास नवा आवाज तरुणाईचा शोचे नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे अवधुतने झी मराठी वाहिनीवरून काढता पाय घेतलेला समजते.