गेल्या २० ते २२ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली आहे. सिद्धार्थचा आनंद आज गगनात मावेनासा झाला आहे त्याला कारणही तितकेच खास आहे. सिद्धार्थ आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांना नेहमीच देत असतो. मात्र यावेळी त्याने चाहत्यांना सुखद धक्का देत आई वडिलांच्या नावाने घर खरेदी केलं आहे. आपल्या हक्काच्या घरावर आई वडिलांचे नाव असावे आहि ईच्छा मनाशी बाळगून असलेल्या सिध्दार्थने त्याचे हे स्वप्न आज पूर्ण केलेलं आहे. ‘४०१, मंदाकिनी रामचंद्र जाधव, रामचंद्र भागोजी जाधव’ अशी घराची पाटी त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे.
मुंबईत आपलं स्वतःचं घर असावं अशी ईच्छा अनेकांची असते. सिध्दार्थने देखील हे स्वप्न बघत असताना पाय जमिनीवर ठेवले होते. त्याचमुळे त्याच्यावर आता मराठी सेलिब्रिटींनीच नव्हे तर बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. सिद्धार्थला मराठी चित्रपटसृष्टीचा कॉमेडी किंग म्हटले जाते. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सिद्धार्थने डीडी सह्याद्रीच्या एक शुन्य बाबुराव मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. २००४ साली, केदार शिंदेच्या अगं बाई अरेच्चा या मराठी चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. हा चित्रपट व्हॉट वुमन वॉन्ट या हॉलिवूड चित्रपटावर आधारित होता. याशिवाय त्याने बॉलिवूडमध्येही काम केले.
सिंबामध्ये सिद्धार्थने सब इन्स्पेक्टर संतोष तावडेची भूमिका साकारली होती. त्याने गोलमाल रिटर्न्समध्ये लकीचा सहाय्यकही साकारला होता. भूमिका कोणतीही असो, सिद्धार्थ नेहमीच आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो. याचमुळे तो मराठी प्रेक्षकांच्या खूप जवळचा वाटतो. सूत्रसंचालन असो वा विनोदी भूमिका प्रत्येक भूमिकेत सिद्धार्थ अगदी चपखल बसलेला आहे. त्याच्या अभिनयाची भुरळ हिंदी सृष्टीला देखील आहे. मराठी सृष्टीत सहाय्यक भुमिका ते चित्रपटाचा नायक म्हणून त्याने जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यामुळे तो आज यशाचा एकेक टप्पा पार करतो आहे. सिध्दार्थला मराठी सृष्टीतील रणवीर सिंग म्हणून मानले जाते ते त्याच्या कपड्यांचा हटके स्टाईलमुळे. त्याचा हा अंदाज सुद्धा प्रेक्षकांना हसायला लावतो हे विशेष.