दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘शेर शिवराज’ हा चित्रपट २२ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच रसिक प्रेक्षकांनी आठवड्याचे ऍडव्हान्स बुकिंग करून चित्रपट गृहा बाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड लावलेले पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी शेर शिवराज या चित्रपटाचा ट्रेलर मेटावूडच्या सहकार्याने मेटाव्हर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला. विशेष म्हणजे ‘शेर शिवराज’ हा मेटाव्हर्सद्वारे लाँच होणारा पहिलाच मराठी चित्रपट ठरला. यामुळे या चित्रपटाचे विशेष कौतुक केले जात आहे.
शेर शिवराज चित्रपटात मुकेश ऋषी यांनी अफजलखानाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुकेश ऋषी यांचे मराठी सृष्टीत पाऊल पडले आहे. त्यामुळे आपल्या भूमिकेबाबत ते खूपच उत्सुक आहेत. मी लोकांच्या रोषाला सामोरे जायला तयार आहे, प्रेक्षकांचा रोष हीच माझ्या अभिनयाची खरी पावती असेल असे त्यांनी चित्रपटाच्या प्रमोशनवेळी म्हटले होते. काल हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदर्शित करण्यात आला त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातील कलाकार मंडळी पुण्यातील चित्रपट गृहांना भेटी देणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना प्रत्यक्षात या कलाकारांना भेटण्याची नामी संधी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
बॉलिवूड, टॉलिवूड सारख्या चित्रपटाला मराठी चित्रपट देखील तगडी टक्कर देत आहेत. मराठी चित्रपट केवळ महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येतात तरी देखील हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर कोट्यावधींचा गल्ला जमवताना दिसले आहेत. पहिल्याच दिवशी शेर शिवराज या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला असून बॉक्सऑफीसवर या चित्रपटाने तब्बल १.५ कोटींचा गल्ला आपल्या खात्यात जमा केला आहे. तर आज दुसऱ्या दिवशी देखील प्रेक्षकांकडून या चित्रपटाच्या प्रतिसादात मोठी वाढ झालेली आढळली आहे. शिवाय कालच्या तुलनेत या चित्रपटाला आज दुप्पट स्क्रिनिंग मिळाले आहेत.
म्हणून आजच्या दिवसात १.८० कोटींचा गल्ला जमवेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शेर शिवराज चित्रपट बनवायला जवळपास ८ कोटींचा खर्च लागला आहे त्यामानाने पहिल्याच आठवड्यात हा चित्रपट आपला झालेला खर्च वसूल करणार याची खात्री वाटते. दिग्पाल लांजेकर यांचा खास शैलीतील दिग्दर्शन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे आहे. सोबत भलीमोठी दिग्गज कलाकारांचा कसलेला अभिनय चित्रपटाच्या यशात मोलाची भर टाकत आहे. चित्रपटाचे उत्तम सादरीकरण आणि यशासाठी संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा.