चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांनी ऐतिहासिक सिनेमाचा काळ गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते त्यांच्या स्वराज्य निर्मितीतील एकाहून एक शौर्यकथा उलगडत भालजीबाबांनी शिवाजी महाराजांच्या व्यक्तीमत्वाची ओळख करून दिली. मध्यंतरीच्या काळात सिनेमा इतिहासातील कथांमधून बाहेर पडला आणि ग्रामीण तमाशापट, माणसाच्या जगण्यातील गोष्टी, बायोपिक यांच्यावर स्थिरावला. पण गेल्या काही दिवसांत पुन्हा मराठी सिनेमाच्या पडदयावर शिवकाळ अवतरला आहे आणि तो प्रेक्षकांकडून उचलून धरला जात आहे. यामध्ये लक्ष वेधले आहे ते दिग्पाल लांजेकर या अवलिया दिग्दर्शकाने. पावनखिंड या तुफान हिट झालेल्या सिनेमानंतर आता आतुरता आहे ती शेर शिवराज या सिनेमाची.

शेर शिवराजने नुकतीच सेन्सॉरची संमती मिळवण्यात बाजी मारली आहे. आता या सिनेमाच्या टीमलाही वेध लागले आहेत ते २२ एप्रिलला प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून पसंतीची मोहर कशी मिळतेय याचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत अनेक घटना या स्वराज्य निर्मितीला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. अनेक अडचणींचे डोंगर पार करत छत्रपती शिवाजी महाराजांनी एकेक गडावर फडकवलेले झेंडे पाहिले की त्यांच्या पराक्रमाची कमान किती उंच होती हे लक्षात येते. शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रत्येक सिनेमा पाहणं म्हणजे प्रेक्षक म्हणून नवी अनुभूती देणारा असतो यात शंका नाही. आणि यामध्ये भर घालण्यात दिग्पाल लांजेकर यांची फौज नेहमीच आघाडीवर आहे. आताही शेर शिवराज या सिनेमात कसलेले कलाकार दिसणार आहेत.

प्रत्येक भूमिका जीवंत करण्यासाठी या कलाकारांनी कंबर कसली आहे. जो हुरूप त्या मावळ्यांमध्ये होता तोच हुरूप आणि उत्साह शेर शिवराज या सिनेमाचे धनुष्य पेलण्यासाठी कलाकारांमध्ये संचारला आहे. अफझलखानाचा वध हा अध्याय शिवचरित्रात महत्वाचा आहे. याच प्रसंगावर शेर शिवराजचे स्क्रिनप्ले करण्यात आले आहे. अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकर याने ही जबाबदारी घेत शेर शिवराज आधी स्क्रिप्टवर उतरवला. आणि त्याला ऐतिहासिक सिनेमाची नस सापडलेल्या दिग्पाल लांजेकर या दिग्दर्शकाने पडदयावर साकारले आहे. विजापूरच्या दरबारात बसून, मै शिवाजी को लाऊंगा, जिंदा या मुर्दा अशी आरोळी ठोकणाऱ्या खानालाच यमसदनी पाठविले. मुत्सदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील हा पट शेर शिवराज उलगडण्यासाठी सज्ज झाला आहे.
शिवराज अष्टक या संकल्पनेतील हा सिनेमा आहे. यापूर्वी फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड सिनेमातून देदीप्यमान इतिहास मांडला. शेर शिवराजमध्ये अफझलखानाचा वध यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून या सिनेमाच्या उत्कंठतेने शिखर गाठले आहे. एकतर छत्रपती शिवाजी महाराज हा संवेदनशील विषय, अफझलखान वधाचा अध्याय, धर्माशी निगडीत संवाद, प्रसंग अशा अनेक गोष्टी कोलाज होत असताना सिनेमात काही आक्षेपार्ह राहणार नाही याची काळजी टीमने घेतली आहेच. पण कोणत्याही सिनेमासाठी सेन्सॉर कडून हिरवा कंदील मिळणं गरजेचं असतं. शेर शिवराज या सिनेमाने इथे तर बाजी मारली, टीमने हा आनंद सोशल मिडियावर शेअर केला आहे.