मराठी बिग बॉसच्या घरातून सोनाली पाटील हिने नुकतीच अनपेक्षित एक्झिट घेतली आहे. गेल्या ९२ दिवसापासून ती बिग बॉसच्या घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसली. मात्र काल उत्कर्ष, विकास, मीरा आणि सोनाली यांच्यापैकी एक सदस्य घराबाहेर पडणार असल्याने, त्यांच्या बॅग बाहेर नेण्यात आल्या. त्यातील तीन बॅग परत घरात दाखल झाल्या. त्यावेळी सोनालीची बॅग त्यात नव्हती. त्यामुळे ह्या आठवड्यात सोनाली घराबाहेर पडणार हे निश्चित झाले.सोनाली घराबाहेर पडल्याने बिग बॉसच्या घरात आता ६ सदस्य उरले आहेत. त्यातून एक सदस्य एलिमीनेट झाल्यावर अंतिम ५ फायनलिस्ट कोण असतील हे स्पष्ट होईल.
सोमवारच्या भागात बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसणार आहेत. उद्या बिग बॉसच्या मंचावर पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यातील एका प्रेक्षकाने जयच्या आजवरच्या वागण्यावर नाराजी दर्शवली आहे. तर एका प्रेक्षकाने विशालला सर्वांच्या मनात असलेला एक अनुत्तरित प्रश्न विचारला आहे. ह्या प्रश्नावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात सदस्यांच्या कुटुंबीयांनी हजेरी लावली होती. त्यावेळी विशालला भेटण्यासाठी त्याची आई आणि बहीण आले होते. आपल्या आईला आणि बहिणीला पाहून विशाल खूपच भावुक झाला होता आणि तो रडूही लागला होता. ह्यावर विशालच्या आईने विशालला जास्त रडत जाऊ नकोस, सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला तुझ्याकडून अपेक्षा आहेत असा सल्ला दिला होता.
त्यानंतर विशालने वडिलांची चौकशी केली होती आणि ते आत्ता इथे यायला पाहिजे होते असे म्हटले. त्यावेळी त्याने आणखी एका व्यक्तीची विचारपूस कर असे म्हटले होते. सौंदर्याच्या नावाचा उल्लेख करत, तू तिला फोन कर असं विशाल त्याच्या आईला म्हणाला होता. तिच्याबद्दल जास्त बोलू नकोस वेळ आल्यावर मी सांगेल असे तो नेमकं का म्हणाला याचे उत्तर अजूनही त्याने दिलेले नाही. त्यानंतर मात्र विशालने तिचा उल्लेख का केला? आणि ही सौंदर्या नक्की कोण असावी? असे प्रश्न त्यावेळी तमाम प्रेक्षकांना पडले होते. नेमक्या ह्याच मुद्द्याला अनुसरून ‘सौंदर्याचं नाव नव्हतं घ्यायचं तर तू मुद्दा का काढला’. असा प्रश्न एका प्रेक्षकाने विशालला विचारला आहे. यावर विशाल काय उत्तर देतो याची उत्कंठा सगळ्यांनाच लागून राहिली आहे. त्यामुळे सोमवारच्या भागाची ही आतुरता जास्तच वाढली आहे.