अक्षय्यतृतीयेच्या शुभमुहूर्तावर वाढदिवसाच्या निमित्ताने कलाकार संदीप पाठक याने ‘राख’ या बहुचर्चित चित्रपटाचे पोस्टर अनावरण केल्याचे सर्वांना माहीतच आहे. आज या चित्रपटाची निवड टोरोंटो फिल्म फेस्टिवलमध्ये झाल्याचे संदीपने जाहीर केले आहे, एका पोस्ट द्वारे हि आनंददायी बातमी रसिक प्रेक्षकांसोबत व्यक्त केली आहे. राख द सायलेंट फिल्म असे नाविन्यपूर्ण शीर्षक असलेल्या या चित्रपटात कलाकारांना विना संवाद अभिनय करण्याची अनोखी परीक्षा द्यावी लागली.
एका कलाकाराला फक्त हावभाव आणि हातवारे यांच्या जोरावर केलेला मूक अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहचवणे हे खरे आव्हान म्हणावे लागेल. संदीप हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून अनावरण केलेल्या पोस्टरमध्ये तो एका रेल्वे रूळावर कान लावून रेल्वेच्या येण्याचा अंदाज घेताना दाखवले होते. राजेश चव्हाण, योगेश गोलटकर आणि कुणाल प्रभू यांची प्रमुख निर्मिती असलेल्या या चित्रपटाने संपादन केलेल्या यशाने मराठी चित्रपट सृष्टीची प्रतिमा आणखी उजळवण्याचे काम केले आहे. संदीपच्या चेहऱ्यावर उंत्कंठा, प्रश्न आणि पुढे काय घडेल याची चिंता, जाणीव पोस्टरमध्ये स्पष्टपणे जाणवत होती. निरनिराळ्या धाटणीच्या प्रभावी भूमिका करणारा एक प्रयोगशील अभिनेता म्हणून संदीप कायम चर्चेत राहिला आहे. इडक चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत झळकला होता. डॉ. लक्ष्मणराव देशपांडे यांचे वऱ्हाड निघालंय लंडनला हे एकपात्री नाटक देखील त्याने त्याच्या अभिनय कौशल्याने गाजवले आहे.
मूळचा बीड जिल्ह्यातील माजलगाव मधील असलेल्या संदीपने कॉलेजचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यातील ललित कला अकादमीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्याने आजवर अनेक नाटक आणि मालिका केल्या आहेत, तसेच हरिश्चंद्राची फॅक्टरी, एक डाव धोबीपछाड, शहाणपण देगा देवा, पोस्टर गर्ल चित्रपटांत विविध भूमिका साकारल्या आहेत. प्रेक्षक आणि चाहत्यांच्या संपर्कात राहता यावं यासाठी संदीपने मागील महिन्यात स्वतःच्या वेबसाईटचे आईच्या शुभहस्ते अनावरण केले होते, प्रेक्षकांनी त्याच्या या निर्णयास उदंड प्रतिसाद दिला आहे. राख चित्रपटाच्या यशाबद्दल सर्व टीमचे अभिनंदन आणि पिढीला वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.