सैराट चित्रपटामुळे आर्ची आणि परशा इतकेच सल्या आणि प्रदिपची भूमिका लोकप्रिय झाली होती. या भूमिकांमुळे सल्याची भूमिका साकारणारा ‘अरबाज शेख’ आणि प्रदीपची भूमिका साकारणारा ‘तानाजी गालगुंडे’ हे दोन्ही कलाकार केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात प्रसिद्ध झाले. मैत्री कशी असावी याचे उदाहरण म्हणजे आकाश, सल्या आणि प्रदीपची जोडी चित्रपटातून सुरेख दर्शवली होती. आता हेच कलाकार छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
झी मराठी वाहिनीवरील ‘कारभारी लयभरी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी तेजपाल वाघ यांची निर्मिती असलेली ‘मन झालं बाजींद’ ही नवी मालिका दाखल होणार आहे. मालिकेचे नाव कळताच अनेकांनी ‘बाजींद’ या शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी गुगल सर्च केलं होतं. त्यामुळे मालिकेच्या नावावरूनच या मालिकेबाबतची उत्सुकता निर्माण झाली आहे. या मालिकेत प्रमुख भूमिकेत श्वेता खरात आणि वैभव चव्हाण हे कलाकार झळकणार आहेत. श्वेता खरात हिने कलर्स मराठीवरील राजा राणीची गं जोडी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेत ती सहकलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळाली. मन झालं बाजींद ही तिची प्रमुख नायिका असलेली पहिली टीव्ही मालिका ठरली आहे. तर वैभव चव्हाण याने स्वराज्यजननी जीजामाता मालिकेतून विरोधी भूमिका साकारली होती. तर त्याने नाटकातून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे.
श्वेता आणि वैभव यांच्यासोबत सैराट चित्रपट फेम ‘तानाजी गालगुंडे’ आणि ‘अरबाज शेख’ हे दोघेही महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सैराट नंतर तानाजी गळगुंडे गस्त आणि फ्री हिट दणका चित्रपटात चमकला तर अरबाज शेख फ्री हिट दणका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आला. दोन्ही चित्रपटानंतर आता हे दोघे मित्र मन झालं बाजींद मालिकेतून छोट्या पडद्यावर पदर्पणास सज्ज झाली आहेत. दोघांची जुळून आलेली केमिस्ट्री आपण सैराट आणि फ्री हिट दणका चित्रपटातून अनुभवली आता त्यांच्या अभिनयाला या मालिकेमुळे मोठा वाव मिळणार आहे. त्यामुळे सल्या आणि बाळ्या छोट्या पडद्यावर देखील हिट ठरणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. तुर्तास या दोघांनाही पहिल्या वहिल्या मालिकेनिमित्त kalakar.info टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा….