सचिन पिळगावकर दिग्दर्शित “तू तू मै मै” या हिंदी मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. ९० च्या दशकात सासू सुनेची मजेशीर भांडणं या मालिकेतून दाखवली गेली. सासूच्या भूमिकेत अभिनेत्री रिमा लागू झळकल्या होत्या, तर सुनेच्या भूमिकेत सुप्रिया पिळगावकर झळकल्या. सासू सुनेची ही जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. या मालिकेमुळे सुप्रिया यांना हिंदी सृष्टीत विशेष ओळख मिळाली होती. २६ जुलै १९९४ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. तब्बल १६९ भागापर्यंत पोहोचलेल्या या मालिकेने टेलिव्हिजन क्षेत्रात कमालीची लोकप्रियता मिळवली होती.
सुप्रिया, रिमा लागू यांच्या सोबत सचिन पिळगावकर महत्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळाले होते. तर महेश ठाकूर, भावना बलसावर, अली असगर, रेशम टिपणीस, कुलदीप पवार, स्वप्नील जोशी सारख्या कलाकारांनी मालिकेला चांगली साथ दिली होती. सासू सुनेची ही मजेशीर भांडणं आता प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. लवकच सचिन पिळगावकर या मालिकेचे दुसरे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहेत. या मालिकेबद्दल बोलताना त्यांनी म्हटले आहे की, “सासू सुनेच्या भांडणावर आणि त्यात होणाऱ्या हलक्या फुलक्या कॉमेडीवर प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दाखवलं. त्यावेळी ही मालिका खूप लोकप्रिय झाली होती.
तू तू मैं मैं मालिकेत रिमा लागू यांनी सासूची भूमिका साकारली होती. त्यावेळी ही मालिका पाहणारी मुलं शाळेत जात होती, आता ती तरुण वयात आहेत. यात सुप्रिया सुनेच्या भूमिकेत दिसली होती. ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला यावी अशी माझी ईच्छा आहे. त्यावर लवकरच काम सुरू होणार आहे. पण या दुसऱ्या पर्वात सासूची भूमिका सुप्रिया साकारताना दिसणार आहे.” सचिनजींच्या या खुलास्या नंतर मालिकेत सुनेची भूमिका कोण निभावणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. सासू सुनेची हलकी फुलकी नोकझोक पुन्हा एकदा प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन करणारी ठरणार आहे. कट कारस्थाने करणाऱ्या सीरिअल पेक्षा कॉमेडी सीरिअलला प्रेक्षकांची जास्त पसंती असेल यात शंका नाही.