तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेतून हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले होते. या मालिकेत त्यांनी साकारलेली राणा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. मालिकेतील रील लाईफ जोडी आता रिअल लाईफमध्ये लवकरच विवाहबद्ध होत आहे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरली आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका कोल्हापूरला शूट होत होती त्यामुळे कोल्हापूरकारांशी त्यांचे एक भावनिक नाते जोडले गेले आहे. ३ मे रोजी हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी कुठलाही गाजावाजा न करता ठाण्यात साखरपुडा केला होता.

त्यांनी साखरपुड्याचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. साखरपुड्यानंतर हार्दीकने अक्षयाचा वाढदिवस तिच्या घरी सरप्राईज देऊन साजरा केला होता. मालिकेत काम करत असताना या दोघांनी लग्न करावे अशी प्रेक्षकांनी ईच्छा व्यक्त केली होती. प्रेक्षकांची हीच ईच्छा आता लवकरच पूर्णत्वास येणार आहे. अक्षया आणि हार्दिक जोशी लवकरच विवाहबद्ध होत आहेत. या दोघांच्याही घरी लगीनघाई सुरू झालेली आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी लग्न कुठे करणार याचा खुलासा केला होता. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे याचे पुण्यात डेस्टिनेशन वेडिंग नुकतेच पार पडले.

या दोघांचे लग्न ज्या ठिकाणी पार पडले तिथेच हार्दिक आणि अक्षया लग्न करणार असे ठरवले आहे. विराजस आणि शिवानी यांनी पुण्यातील कर्वेनगर येथील डी पी रोड जवळील पंडित फार्म्स या ठिकाणी मोठ्या थाटात लग्न केले होते. हार्दिक आणि अक्षयाने पंडित फार्म्सला नुकतीच भेट दिली होती आणि त्यांना हे ठिकाण खूप आवडले होते. याच ठिकाणी हे दोघेही लग्न करणार असेही त्यांनी सांगितले होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावली होती. त्यावेळी हार्दिकने खुलासा केलेला पाहायला मिळाला. यावेळी अक्षयाचा स्वभाव कसा आहे असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
त्यावर हार्दिक म्हणाला होता की, एखाद्या गोष्टीवर ती काय आणि कशी प्रतिक्रिया देणार याचा मला अंदाज आलेला असतो. एकूणच वाघ कधी डरकाळी फोडणार हे माहीत असतं. हार्दिक पुढे असेही म्हणाला की, ती पटकन रागावते त्यानंतर ती काहीही बोलते, लग्नानंतर तिने ही गोष्ट बदलायला हवी असे तो तिच्याबद्दल सांगतो. दरम्यान आता हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याने त्यांच्या लग्नाच्या लुकची चर्चा विशेष रंगली आहे. त्यांच्या लग्नाचे खास वैशिष्ट्य असे की या लग्नात कोल्हापुरी थाट पाहायला मिळणार आहे, हे सरप्राईज काय असणार याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.