मुरांबा जसजसा मुरत जातो तसतशी त्याची चव अधिक वाढत जाते अगदी त्याचप्रमाणे स्टार प्रवाह वरील मालिका मुरांबा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मालिकेत शशांक केतकर आणि शिवानी मुंढेकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या दोघांनी साकारलेली रमा अक्षयची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. सुरुवातीला रमाचा रागराग करणारा अक्षय तीच्या प्रेमात आता हळूहळू गुंतताना पाहायला मिळतो आहे. त्यांच्या प्रेमाचा आंबट गोड असा हा मुरांबा मुरू लागल्याने प्रेक्षकांनी देखील निश्वास टाकला आहे. मालिकेच्या कलाकारांसोबत कथानकावर देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर शशांक केतकर एका रोम्यांटिक भूमिकेची वाट पहात होता.

शशांकसाठी अक्षयची भूमिका मोठी संधी मिळवून देणारी ठरली आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारा आणि आजीच्या धाकात वाढलेला असा हा अक्षय रमाच्याही प्रेमात पडला आहे. भुमिकेच्या बाबतीत तुम्ही कितीही वेगळा प्रयोग करायला गेलात तरी लव्हस्टोरीची गोष्टच वेगळी आहे असे तो या भूमिकेबाबत म्हणतो. प्रेक्षकांना लव्हस्टोरी आपलीशी वाटते. मालिकेच्या नावाप्रमाणेच मुरांबा एक आंबट गोड लव्हस्टोरी आहे. तर शिवानीसाठी देखील रमाची भूमिका तितकीच विशेष आहे. आपल्या पहिल्याच मालिकेत शशांकसोबत स्क्रीन शेअर करायला मिळाल्याने शिवानी मुंढेकर देखील खूपच खुश आहे. या मालिकेत सुलेखा तळवळकर, इरावती हर्षे, नेहा निमगूळकर, शाश्वती पिंपळीकर, श्वेता कामत, निशाणी बोरूळे, अभिजित चव्हाण यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

शाळा, कॉलेजमध्ये असताना शिवानीने सांस्कृतिक कार्यक्रमातून नेहमीच सहभाग दर्शवला होता. शिवानी मुंढेकर ही मूळची कराडची. इंजिनिअरिंगची पदवी तिने प्राप्त केली आहे. लहाणपणा पासूनच शिवानीला अभिनयाची आणि नृत्याची आवड आहे. यातून तिने डान्स फेस्टिव्हल मध्येही आपल्या नृत्याची झलक दाखवून दिली. काही जाहिरातींसाठी शिवानीने मॉडेलिंग केलं आहे. मुरांबा ही शिवानीने अभिनित केलेली पहिलीच मालिका आहे. या मालिकेमधून तिला मुख्य नायिका साकारण्याची संधी मिळाली असल्याने शिवानी खूपच खुश आहे. मालिकेत तिने साकारलेली रमा प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरली आहे. शिवानी मुंढेकर हिला तिच्या अभिनय क्षेत्राच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.