आदिल दुर्रानीसोबत वाद झाल्यानंतर राखी सावंत गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. राखीच्या विरोधात आदिलने अनेक पुरावे सादर केले, तिला दोषी सिद्ध करण्यासाठी तो तिच्या मैत्रिणींना देखील आपल्या बाजूने वळवताना दिसला. राखी सावंतची खास मैत्रीण राजश्री मोरे हिनेही राखीलाच खोटे ठरवले. जेव्हा राजश्री राखीच्या विरोधात बोलू लागली तेव्हा आदिलने या मैत्रिणींमध्ये कायमची फूट पाडली असे बोलले जाऊ लागले. आदिलच्या प्रत्येक आरोपांवर राखीने सडेतोड उत्तरं दिली.
मात्र त्यानंतर बरेच दिवस चाललेले हे शीतयुद्ध पाहून लोकांनीही या प्रकरणाकडे पाठ फिरवली. राखी काही आरोप करते न करते तोच आदिल मिडियासमोर येऊ लागला. हे शीतयुद्ध थांबता थांबेना. त्या नंतर मात्र या प्रकरणापासून मीडियाने देखील काढता पाय घेतला. पण आता राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. त्याला कारणही तेवढेच खास आहे. राखी तिच्या आयुष्यावर जीवनपट बनवण्याच्या विचारात आहे. अर्थात या बायोपिकमध्ये राखीचे संपूर्ण आयुष्य उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. राखीचा स्ट्रगल काळ, वेगवेगळ्या मॉडेल सोबत तिचे वाद, लग्न या सगळ्यावरचा पडदा या बायोपिकमधून उलगडणार असल्याचे तिने म्हटले आहे. राखी सावंतने नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली.
राखीने बायोपिक बनवणार असल्याचे जाहीर केले आहे. हा बायोपिक कोण दिग्दर्शित करणार हे अजून ठरलेले नाही असे राखी स्पष्ट करते. दरम्यान आपल्या बायोपिकसाठी तिने दोन बॉलिवूड अभिनेत्रींची नावं सुचवली आहेत. एक आलिया भट आणि दुसरी विद्या बालन. या दोन्ही अभिनेत्रींना बायोपिकसाठी विचारण्यात येईल असे तिने म्हटले आहे. राखीचा हा बायोपिक येईल तेव्हा येईल पण तिच्या या घोषणेवरच अनेकांनी तिची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला आहे. राखी सावंत ड्रामा क्वीन आहे. तिचं आयुष्य हे गूढ कथांनी भरलेलं आहे. अनेक वादविवादात अडकलेली राखी सावंत बऱ्याचदा इमोशनल ब्लॅकमेल करते असाही ठपका तिच्यावर पडलेला आहे. त्यामुळे तिचा हा बायोपिक कोण बघणार अशाही प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया तिला मिळू लागल्या आहेत.