मन उडू उडू झालं या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. इंद्रावर प्रचंड प्रेम असूनही केवळ बाबांच्या तत्वांना तडा जाऊ नये म्हणून दिपू आजवर प्रत्येक गोष्ट सहन करत राहिली. आता इंद्रा सरळमार्गी काम करताना पाहून दिपूचे बाबा म्हणजेच देशपांडे सर त्यांच्या लग्नाला होकार देत आहेत. मालिकेत लवकरच दिपू आणि इंद्राची लगीनघाई पाहायला मिळणार आहे. लग्नाची लगबग आणि खरेदी या सर्व गोंधळात दिपू आणि इंद्राची जुळून आलेली केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. काही दिवसांपूर्वीच कानविंदे कुटूंबाने या मालिकेतून निरोप घेतलेला पाहायला मिळाला. त्यापाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्याने मालिकेला निरोप दिला आहे.
त्यामुळे इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत खूपच भावुक झालेला पाहायला मिळाला. अमित परब याने या मालिकेत नयन रावांची भूमिका साकारली होती. आपली नोकरी सांभाळून तो या मालिकेत शलाकाच्या नवऱ्याची भूमिका निभावताना दिसला. मात्र हा ट्रॅक संपल्याने नयन, स्नेहलता आणि विश्वासराव कानविंदे यांची मालिकेतून एक्झिट करण्यात आली. त्यावेळी अमित परब खूपच भावुक झाला होता. या तिघा पाठोपाठ आता बँकेचे मॅनेजर सोनटक्के सर या मालिकेतून एक्झिट घेत आहेत. सोनटक्के सर दिपूला नेहमी कामं सांगून त्रास द्यायचे मात्र इंद्राला पाहून त्यांची घाबरगुंडी उडायची. इंद्राला पाहून ते सतत डोक्यावरचा घाम पुसायचे. यावरून डोक्याला घाम आलेला पहिला माणूस असे मिम्स त्यांच्यावर व्हायरल झाले होते.
त्यावेळी हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. सोनटक्के सरांची भूमिका राजू बावडेकर यांनी साकारली होती. राजू बावडेकर यांनी नुकतेच मालिकेचा शेवटचा त्यांचा सिन पूर्ण करून या मालिकेला निरोप दिला आहे. यावेळी इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत ने त्यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. विश्वासच वाटत नाही की हा तुमचा मालिकेचा शेवटचा सिन आहे. राजू बावडेकर दादा यांच्यासारखा गोड माणूस आणि उत्तम विनोदाचे टायमिंग असणाऱ्या अभिनेत्यासोबत काम करायला मिळालं. एसपी बँक ही माझ्यासाठी कायम खास राहणार आहे. ह्याचं सगळं श्रेय सोनटक्के सर आणि मीनाक्षी कुंटे मॅडम यांना जातं.
हृतासोबत रिकव्हरी करतानाही खूप खूप मज्जा आली. असे म्हणत अजिंक्यने राजू बावडेकर यांना भावनिक निरोप दिला आहे. अर्थात मालिकेचा ट्रॅक बदलण्यात आल्यामुळे कलाकारांची एक्झिट होणे आवश्यकच आहे. मात्र मालिकेतून एकत्रित काम करत असताना जुळून आलेले बॉंडिंग तितकेच महत्वाचे ठरते. त्यामुळे त्या सोबतच्या कलाकाराला निरोप देताना भावना मोकळ्या करणे तितकेच गरजेचे असते हे अजिंक्यने दाखवून दिले आहे.