काल बिग बॉसच्या घरातून रोहित शिंदे बाहेर पडला. त्यानंतर विशाल निकम आणि मीरा जगन्नाथ यांनी देखील एक्झिट घेतलेली पाहायला मिळाली. राखी फुल एंटरटेनर आहे म्हणून अजून काही दिवस तिला या घरात राहण्याची संधी मिळाली आहे. आरोह वेलणकर हा देखील अजून काही दिवस या घरात राहणार आहे. अक्षय केळकर चुकीचा खेळला त्याच्यामुळेच तेजस्विनीला घरातून बाहेर जावे लागले, असा रोखठोक मुद्दा महेश मांजरेकर समोर मांडल्यामुळे आरोहचे कौतुक करण्यात येत आहे. बिग बॉसच्या घरात चॅलेंजर्स म्हणून आलेल्या राखी सावंतने शो चा टीआरपी चांगलाच वाढवला आहे.
राखी घरात आल्यापासून केवळ तिचेच अस्तित्व सगळ्यांना जाणवू लागल्याने बाकीचे सदस्य गायब झाले आहेत की काय अशी शंका प्रेक्षकांच्या मनात येऊ लागली आहे. कारण इतके दिवस अपूर्वा नेमळेकरचा आवाज या घरात घुमत होता. आता तो देखील तिच्यामुळे शांत झाला असल्याने राखीवर जास्त फोकस दिला जात आहे. बिग बॉसच्या घरातील एक सदस्य असा आहे जो खूप शांत शांत आहे. आपले मत व्यक्त करायला तो लवकर तयार होत नाही. अमृता देशमुख आणि प्रसाद खूप चांगले मित्र आहेत, मात्र तो तिच्याशी देखील मोकळेपणाने बोलताना दिसत नाही. यावरून राखीने प्रसादची चांगलीच फिरकी घेतलेली पाहायला मिळत आहे. प्रसाद जेव्हा इतर सदस्यांसोबत गार्डन एरियात बसलेला असतो, तेव्हा राखी तिथे येऊन प्रसादच्या मांडीवर जाऊन बसते.
राखीचा हा प्रकार पाहून प्रसाद मात्र पुरता गोंधळून जातो. राखीला उचलून घेत तो तिला असं काही करू नकोस हे सुचवण्याचा प्रयत्न करतो. ‘राखी मी तुझ्या पाया पडतो मला माफ कर’, असे म्हणून तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. खरं तर राखी कोणत्या क्षणी काय करेल हे स्वतः तिला देखील माहीत नसावं. त्यामुळे राखी प्रेक्षकांना आपल्या कृतीतून फुल्ल एंटरटेनमेंट करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आरोह सोबत राखीने एक डान्स केला होता तेव्हा आरोह देखील राखीपासून थोडासा घाबरून होता. कारण ही राखी कधी काय करणार याची कल्पना समोरच्याला देखील नसते. आता प्रसादच्या उडालेल्या गोंधळाचा ठाव प्रेक्षकांना देखील लागल्याने राखीच्या या कृतीवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या आठवड्यात किरण माने राखीच्या मागेपुढे करताना दिसले. त्यावरून महेश मांजरेकरांनी किरणला राखीचं माकड झालं असल्याची प्रतिक्रिया दिली होती. नुसतंच माकड नाही तर हे माकड आता राखीच्या मागं लोळायला देखील लागलं आहे असे म्हणत मानेंची खिल्ली उडवली होती. मात्र ही प्रतिक्रिया सकारात्मकतेने घेत किरण माने यांनी देखील हसून यावर दिलखुलास दाद दिली होती.