माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा ५ जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी मालिकेच्या सेटवर मेकअप रूम सजवून प्रर्थानाला बर्थडे सरप्राईज देण्यात आले होते. तर मालिकेच्या बॅक आर्टिस्ट आणि सहकलाकारांनी प्रार्थनाला आवर्जून गिफ्ट आणले होते. श्रेयस तळपदे, काजल काटे, संकर्षण कऱ्हाडे या सर्वांसोबत परी म्हणजेच लाडक्या मायराने देखील आपल्या ऑनस्क्रीन आईसाठी बर्थडे गिफ्ट दिले. हे सर्व प्रेम पाहून प्रार्थना पूर्ण भारावून गेली होती. परी आणि नेहामधलं हे गोड नातं ऑफस्क्रीनही तितकंच निरागस आहे.
प्रार्थना मायरासोबत ऑफस्क्रीन नेहमीच माजमस्ती करताना दिसते त्यामुळे त्यांच्यात छान बॉंडिंग जुळून आलं आहे. परी जशी मालिकेतल्या कलाकारांसाठी खास आहे तशीच ती प्रेक्षकांची देखील आवडती बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील घडामोडीमुळे परीचे अभिनयातील एक्सप्रेशन्स प्रेक्षकांना भारावून टाकणारे ठरले आहेत. त्यामुळे मायरा आता हळूहळू एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळखली जात आहे. मायरासोबत मजामस्ती करताना हे कलाकार देखील तिच्याच वयाचे होऊन जातात. काही दिवसांपूर्वी मालिकेच्या सेटवर परी म्हणजेच मायराने सिमी काकूंची नक्कल केली होती. मायराचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओवरून अनेकांनी मायराचं कौतुक केलं होतं. सेटवरचं वातावरण हलकं फुलकं राहावं आणि प्रत्येकाचं छान बॉंडिंग जुळावं म्हणून सर्वच कलाकार प्रयत्न करताना दिसतात.
त्यात प्रार्थना बेहरे आणि मायरा यांच्यात ऑफ स्क्रीनही छान नातं निर्माण झालं आहे. परीमुळे मी आई बनण्याचा अनुभव घेत आहे, त्याचमुळे आमच्या अभिनयातील सहजता प्रेक्षकांच्या पुढे मांडता येते असे प्रार्थना म्हणते. मायरा वायकुळचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रेक्षकांना पाहायला मिळतील. मालिकेत येण्याअगोदरपासूनच मायरा सोशल मीडियावर हिट झाली होती. मायराच्या नावाने युट्युब चॅनल असून अनेक चाहत्यांनी तिच्या या व्हिडिओजना छान प्रतिसाद दिला आहे. मालिकेतून तिने साकारलेली निरागस परी प्रेक्षकांना खूपच भावलेली पाहायला मिळते. पहिल्याच मालिकेमुळे अवघ्या ५ वर्षाची ही चिमुरडी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. भविष्यात मायरा कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेणार याची खात्री आहे. तिच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.