येऊ कशी तशी मी नांदायला ही झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि त्यातील कलाकार गेल्या काही दिवसांपासून ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा महाएपिसोड दाखवण्यात आला होता. ओम आणि स्वीटूचे लग्न होणार आणि हा लग्न सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. मात्र या महाएपिसोडने प्रेक्षकांची घोर निराशा केली होती. ओम आणि स्वीटू यांच्या लग्नाऐवजी मालिकेत मोठा ट्विस्ट आणून स्वीटूचे लग्न मोहित सोबत लावण्यात आले त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक खुपच नाराज झालेले पाहायला मिळाले. त्यावर ही मालिकाच आता बंद करा अशा जोरदार विरोध दर्शवणाऱ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून मिळाल्या. यानंतर मालिकेतील कलाकार देखील ट्रोलिंगला सामोरे जात आहेत. मालिकेत मोहित सुरुवातीपासूनच विरोधी भूमिका दर्शवताना दिसला.
ही भूमिका साकारणारा निखिल राऊत याच्यावरही अनेकदा टीका केली गेली. परंतु ह्यासर्व गोष्टी आता असह्य होत असल्याचे नुकतेच त्याने सांगितले आहे. याबाबत निखिल राऊत म्हणतो की, मालिकेचा महाएपिसोड झाल्यानंतर आम्ही ट्रोल होणार हे आम्ही अगोदरच जाणून होतो. आणि तसेच घडले देखील मात्र मला देखील तुमच्यासारखच ओम आणि स्वीटूचे लग्न न झाल्याने वाईट वाटत आहे. लेखकाने माझ्या भूमिकेबाबत जे लिहिलंय तेच मी करत आहे. मी केवळ अभिनेता आहे आणि मी माझे काम माझ्या परीने चोख बजावत आहे. तुम्हाला या भूमिकेचा राग येणं सहाजिक आहे. गेल्या काही दिवसांपासून मी ट्रोल होत आहे. परंतु असे असले तरी या गोष्टी मी सकारात्मकतेने पाहत आहे मात्र आता हे ट्रोलिंग मर्यादेपलीकडे जात आहे. काही जण माझ्या पत्नीच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर जाऊन ट्रोलिंग करत आहेत. आता हे सहन केले जाणार नाही. मोहित ही फक्त एक भूमिका आहे आणि लोकांनी ते समजून घेणे गरजेचे आहे. खऱ्या आयुष्यातला निखिल राऊत हा मोहितच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळा आहे.
निखिल राऊत प्रमाणे मालिकेतील अदिती सारंगधर ही देखील विरोधी भूमिकेत पाहायला मिळत आहे. या भूमिकेमुळे ती देखील प्रेक्षकांकडून नेहमीच ट्रोल होताना दिसते. तर मालिकेतील नलू म्हणजे अभिनेत्री दीप्ती केतकर हिला देखील अशाच ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. मालिकेत आजपासून नव्या पात्राची एन्ट्री होत आहे. ही भूमिका अभिनेत्री प्रिया मराठे साकारणार आहे. प्रिया मराठे ओम आणि स्वीटू यांच्यातील गैरसमज दूर करून पुन्हा त्यांना एकत्र आणणार आहे. त्यामुळे मालिकेतला हा बदल प्रेक्षक स्वीकारतील का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.