खवय्ये पुणेकरांच्या पसंतीचे मुदपाकखाना हा शाश्वतीचा हॉटेल व्यवसाय गाठतोय यशाची शिखरे.. अभिनेता रितेश देशमुख यांची निर्मिती आणि रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक या मराठी चित्रपटात शाश्वती पिंपळीकरने डॉली नावाच्या युवा कलाकाराची व्यक्तिरेखा साकारली होती. अभिनेता रोहित फाळके, भाग्यश्री संकपाळ, मदन देवधर, किशोर कदम, साई ताम्हणकर अशा विविध कलाकारांची वर्णी असलेला लहान मुलांच्या भाव विश्वातील कल्पनांवर आधारित हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात सर्वच बाल कलाकारांच्या अभिनय कौशल्याचे प्रेक्षकांनी कौतुक केले. पुढे चाहूल या मालिकेतील प्रमुख भूमिकेत तिने अभिनयाची चुणूक दाखवली. सिंधू मालिकेतील तिची सरस्वतीची भूमिका विशेष गाजली. मराठी मालिका पक्के शेजारी मध्येही तिचा अभिनय वाखाणण्याजोगा होता. टेलिव्हिजन जगतात बराच कालावधी घालवल्यानंतर तिने देहभान नावाचे व्यवसायिक नाटक देखील केले.
फोटोग्राफर, ट्रॅव्हलर आणि इंटेरिअर डिझायनर असेलल्या राजेंद्र करमरकर सोबत तिचा विवाह संपन्न झाला, या लग्नसोहळ्या निमित्त सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती. अभिनेत्री शाश्वतीने काही दिवसांपुर्वी सोशल मिडियावर “नमस्कार.. माझं नाव शाश्वती पिंपळीकर. मी एक अभिनेत्री असुन चांगला सिनेमा, सिरियल, वेबसीरीज करु इच्छीत आहे.” अशी पोस्ट टाकली होती. शास्वतीला केक, पिझ्झा, टोस्टेड ब्रेड, छोले पुरी, आमरस, ट्र्फल आणि मसालेदार चवदार चटकदार पदार्थ बनविण्याचा लहानपणापासून छंद होता. केलेल्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून तिने पती राजेंद्र सोबत आपल्या छंदाचे नवीन हॉटेल व्यवसायात रूपांतरित करण्याचे ठरविले.. “गाठी भेटी नाहीत, हॉटेलिंग नाही आणि टपरीवर जाऊन चहा वडापाव तर नाहीच नाही ! आपल्यातल्या खादाड पुणेकरांचं आयुष्य अगदीच बेचव झालंय नाही? .. काळजी करू नका आम्ही घेऊन आलोय ह्या सगळ्यावर एक चमचमीत उपाय.. हॉटेलच्या चटकदार चवीचे महाराष्ट्रीयन, पंजाबी पदार्थांसाठी आम्हाला संपर्क साधा ! ” हि तिची पोस्ट मित्र मंडळींनी आणि पुणेकरांनी वाऱ्यासारखी पसरवली..
“मुदपाकखाना – चव तीच आपल्या घरची” अशा कल्पक नावाने सुरु केलेल्या या व्यवसायाला प्रेक्षक खवय्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हॉटेल सारखी चटकदार चव पण घरच्यासारखं स्वछ, सुरक्षित आणि तितकेच मायेने पाच ते पन्नास लोकांसाठी बनवलेले खाद्यपदार्थ ऑर्डर्स ती घेत आहे. साधारण दोन महिन्याच्या कालावधीत पुण्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य ऑर्डर्स तिला मिळाल्या. घरच्या सारखी चव आणि हॉटेलचा चटकदार ट्विस्ट असलेले पदार्थ खवय्या पुणेकरांना खूपच आवडत आहेत. ह्या व्यवसायात राजेंद्र मनापासून साथ देतोय हे विशेष.. उत्कृत्ष्ट अभिनेत्री ते यशस्वी व्यावसायिक हा तिचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. अभिनेत्री शाश्वती पिंपळीकर करमरकर हिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊया …