नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे दोघे मराठी सृष्टीतले सर्वात प्रसिद्ध चमकते तारे म्हणावे लागतील. या दोघांनी केवळ मराठी सृष्टीतच नाही तर हिंदी सृष्टीतही आपल्या अभिनयाने भल्याभल्यांची बोलती बंद केली आहे. नाना पाटेकर अँग्री मॅनच्या भूमिकेत कायम शोभून दिसते तर अशोक सराफ यांनी बहुढंगी भूमिका गाजवल्या हे आजवरच्या त्यांच्या करकीर्दीवरून तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे नाना पाटेकर यांच्याशी झालेल्या मैत्रीचे किस्से तुम्हाला कमीच ऐकायला मिळतील.
नाना पाटेकर आणि अशोक सराफ फार मोजक्याच चित्रपटात एकत्रित झळकले आहेत. त्यामुळे त्यांच्यात खूप जवळचा संबंध कधी आलाच नव्हता मात्र “हमीदाबाईची कोठी” या नाटकाच्या वेळी जवळजवळ आठ महिने ते एकत्रित काम करत होते. या आठ महिन्यांत आमची खूप चांगली मैत्री झाली होती असं एका मुलाखतीत अशोक सराफ यांनी नानांबद्दल सांगितलं होतं. त्याला माझा स्वभाव आवडला आणि मला त्याचा. तो खडूस मुळीच नाही मात्र तो स्पष्टवक्ता आहे, त्यामुळे त्याचा हा स्वभावगुण कित्येकांना ओळखता आला नाही. कुठल्याही वेळेला अगदी कुठलीही मदत लागली तरी तो तुमच्या मदतीला धावून येईल हे त्याच्या मैत्रीचे विशेष गुण म्हणावे लागतील. अगदी वेळप्रसंगी तुमच्यासाठी तो अंगातला शर्ट देखील काढून देईल… असं अशोक सराफ नानांबद्दल बोलले होते.
एकदा नानांनी लोकांचा मार खाण्यापासून मला वाचवलं होतं हा किस्सा अशोक सराफ यांनी या मुलाखतीत सांगितला होता तो नेमका काय होता ते जाणून घेऊयात… “एकदा नाटक रद्द झालं म्हणून प्रेक्षक खूप चिडले होते त्यामुळे ते चिडलेले प्रेक्षक मला मारण्यासाठी माझ्या मागे धावले होते. त्यावेळी नानाने मला तेथून पळवलं होतं. थिएटरच्या मागच्या बाजूने गटारातून उडी मारुन आम्ही दोघेजण पळालो होतो. मला घेऊन तो अक्षरश: धावत सुटला होता. त्यावेळी ढकलण्याची जी रिक्षा असते ती त्याने थांबवली. तो स्वतः ती रिक्षा चालवू लागला आणि मला तिथून घेऊन गेला. नाना पाटेकरने माझा जीव वाचवला होता. नाही तर लोकांनी मला त्यावेळी चांगलाच मारला असता,” अशी एक गोड आठवण अशोक सराफ यांनी या मुलाखतीत सांगितली होती.