अभिनेते किरण माने यांच्या विरोधात मालिकेच्या कलाकारांनी आरोप लावले होते. तर काही कलाकारांनी किरण मानेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला होता. सविता मालपेकर यांनी मुलगी झाली हो या मालिकेत किरण यांच्या आईची भूमिका निभावली होती. त्यामुळे किरण माझ्याशी कधीच वाईट वागला नाही असे त्यांनी म्हटले होते. पण किरण माने स्वताला मालिकेचे यश देऊन टाकतो मी आणि माझ्याचमुळे ही मालिका चालली आहे, असे तो म्हणतो हे सविता मालपेकर यांना खटकले. त्यामुळे त्यांनी किरण मानेच्या वागण्याला विरोध दर्शविला होता. आपल्या विरोधात सविता मालपेकर यांनी दिलेलं मत माझ्यासाठी धक्कादायक आहे असे किरण माने म्हणतात.
याबाबत ते सविता मालपेकर यांना म्हणतात की, मी लाडानं तुला म्हातारे अशी हाक मारायचो. अगदी परवा परवा शेवटच्या दिसापर्यन्त ! तू बी माझ्याशी लै प्रेमानं वागत हुतीस. आपल्या शुटिंगच्या शेवटच्या दिसापर्यन्त! अलीकडच्या दिवसांत कुनीतरी तुझे माझ्याबद्दल गैरसमज करून दिलेवते. किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय. असं तुला वाटायला लागलं, तू मेकअपरुममध्ये बसून मला लै जोरजोरात शिव्या देत हुतीस. तवाबी मी तुझ्याशी भांडलो नाही. तुला भेटून मायेनं तुझा हात हातात घिवून तुझे गैरसमज दूर केलेवते. तुला काही फॅक्ट्स सांगीतल्या वत्या. नंतर तू लेखकांना फोन केल्यावर तुला कळलं की यात किरणची चूक नव्हती.
प्राॅडक्शन हाऊसमधून लेखकांना सांगितलं गेलंवतं की सविता ताईंना वगळून सीन्स लिहा. तुला कळलं काय झालं असेल, ते गुपित तू माझ्याशी बोललीस बी. आपण हसलो आणि मग पुन्हा आपलं म्हातारे इलासा सुरू झालं. परवा तुला टीव्हीवर तावातावाने माझ्या इरोधात बोलताना मला धक्काच बसला ! वाईट वाटलं, काळजात आत कायतरी लै तुटल्यागत झालं. पन म्हातारे, तुझ्यावर राग नाही धरणार. तुझीबी कायतरी मजबूरी आसंल गं. कुनाच्या पोटावर पाय येत असताना कुनी आसं बोलंल व्हय? आत्मा शांत बसंल का त्याचा. म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं? तुझ्या स्वामी समर्थांना तू काय कारन सांगीतलंस असं बोलल्याचं?
त्यांच्या फोटोसमोर बसुन तर आपन परवा आपल्यातला गैरसमज मिटवला वता. असो, त्यांची तुझ्यावर कृपा राहो. माझं म्हन्शील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही! झगडणार लढणार तुला ठावं हाय दुनिया इरोधात गेली तरी सत्य जिंकतं, यावर तुझ्या इलासचा इस्वास हाय. जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईन. येताना मी प्रेमानं तुझ्यासाठी चंद्रविलासची खारी बुंदी आणून देईन. सातारी कंदी पेढे आणून देईन, पूर्वी आणून देत होतो तश्शीच. तेवढ्याच मायेनं! तुझ्यावर राग नाय गं माझा.