दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या १९९५ सालच्या बॉलिवूड चित्रपटाने अभिनय, स्टोरी, गाणी सर्व स्तरांवर इतिहास रचला. थिएटरमध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक काळ चालणारा हा हिंदी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात मिलिंद गुणाजी महत्वपूर्ण भूमिकेत असणार होते. मात्र दाढीमुळे त्यांना ही संधी गमावावी लागली होती. मिलिंद गुणाजी यांनी एका मुलाखतीत सिमरनच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका गमावल्याबद्दल उघड केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत मिलिंद गुणाजी यांनी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटाची एक आठवण सांगितली. हा चित्रपट मिळण्याअगोदर मिलिंद गुणाजी अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त होते.
पण तरीही ते कुलजीतच्या भूमिकेसाठी उत्सुक होते. परंतु ते शक्य झाले नाही कारण, मिलिंद गुणाजी असे चित्रपट करत होते ज्यासाठी त्यांना दाढी ठेवण्याची आवश्यकता होती. चित्रपटातील कुलजीतचे पात्र क्लीन शेव्ह असल्याचे आठवत असेल. ही भूमिका परमीत सेठी यांनी साकारली होती. मिलिंद गुणाजी या भूमिकेबाबत आणखी असेही म्हणतात की, जेव्हा मला चित्रपटाच्या निमित्ताने बोलावण्यात आले. तेव्हा निर्मात्यांना माझ्या चेहऱ्यावर दाढी नको होती. मला दाढी काढता आली नाही कारण मी तीन ते चार चित्रपटांचे शूटिंग करत होतो, ज्यासाठी दाढी आवश्यक होती. मला या गोष्टींचं खरंच वाईट वाटलं. पुढे ते असेही म्हणतात की, त्याच कारणामुळे मी अमिताभ बच्चन यांच्यासोबत मृत्युदातामध्येही काम करण्याची संधी गमावली होती.
मिलिंद गुणाजी यांनी आजवर अनेक बॉलीवूड, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. पपीहा हा त्यांचा पहिला चित्रपट. फरेब, रेस, पानिपत, गोष्ट एका पैठणीची, फिर हेरा फेरी, कृष्ण वंदे जगद्गुरू, असंभव, कारगिल मधील त्यांच्या भूमिका अजरामर ठरल्या. अलीकडे कार्तिक आर्यनची प्रमुख भूमिका असलेल्या भूल भुलैया २ मध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटात शाहरुख खान आणि काजोल मुख्य भूमिकेत होते. सोबतच परमीत सेठी, मंदिरा बेदी, अनुपम खेर, फरीदा जलाल, सतीश शाह, हिमानी शिवपुरी हे देखील प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट दोन दशकांहून अधिक काळ थिएटरमध्ये चालला आहे. आणि आजही या चित्रपटाला प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.