मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. २ ऑक्टोबर पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मराठी बिग बॉसच्या यंदाच्या सिजनमध्ये कोणकोणते सेलिब्रिटी सहभागी होणार याची चर्चा सुरू आहे. अशातच घरातील दहा सदस्यांची आडनावं प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे या आडनावावर प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. बिग बॉसच्या घरात एक राखीव जागा असते. याठिकाणी प्रत्येक सदस्य आपल्या नावाची पाटी तिथे लावताना दिसतो. बिग बॉसच्या घरात एन्ट्री केल्यानंतर ही सदस्य आपल्या नावाची पाटी त्या ठिकाणी लावतात. एलिमीनेशन होते त्यावेळी हीच पाटी घेऊन त्यांना घरातून बाहेर पडावे लागते असा एक नियम आहे.
बिग बॉसच्या चौथ्या सिजनमध्ये मात्र अनेक बदल केले जात आहेत. बिग बॉसच्या घरात सगळं काही आलबेल असेल असे संकेत यावेळी देण्यात आले आहेत. ऑल इज वेल असे म्हटल्यावर महेश सर शाळा घेणार नाहीत अशी एक चर्चा जोर धरताना दिसली आहे. महेश सरांची शाळाच भरणार नसेल तर हा शो पाहायला मज्जा येणार नाही अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. त्यामुळे हा बदल नेमका काय असणार आहे हे लवकरच उघड होईल. तूर्तास बिग बॉसच्या घरातील आडनावाची पाटी प्रेक्षकांचे मात्र लक्ष्य वेधून घेताना दिसली. सायकल, तुळशीवृंदावन आणि आडनावांच्या पाट्या हा बिग बॉसच्या घरातला लूक प्रेक्षकांच्या समोर आला आहे. यात दहा सदस्यांची आडनावे देण्यात आली आहेत.
लोखंडे, देसाई, जोशी, कदम, गोरे, दहिभाते, पाटील, भोसले, कोळी, साटम अशी आडनावं ह्यात पाहायला मिळाली. त्यामुळे ही आडनावं असलेली सदस्य बिग बॉसच्या घरात रहिवासी संघ म्हणून दाखल होणार आहेत. हे दहा सेलिब्रिटी कोण असणार याचा शोध सध्या अनेकजण घेत आहेत. अगोदर म्हटल्याप्रमाणे हार्दिक जोशी या शोमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे जोशी आडनावाची व्यक्ती हार्दिक जोशीच असावी असा शिक्कामोर्तब होत आहे. लोखंडे या आडनावावरून झी मराठीवरील कारभारी लयभारी मालिकेतील श्रीराम लोखंडे या अभिनेत्याचे नाव सुचवले जात आहे. तर साटम आडनाव असलेली मधुरा वेलणकर साटम आणि शिवाजी साटम या दोन व्यक्ती आहेत.
त्यामुळे या दोघांपैकी बिग बॉसच्या घरात कोण हजेरी लावणार याची उत्सुकता आहे. इतर आडनावे असलेले कलाकार इतके आहेत कि आपला आवडता कलाकार या शो मध्ये येणार की नाही याची आतुरता लागली आहे. बाकीची आडनावं असलेली सदस्य नेमकी कोण असणार आहेत यावर खरोखरच प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दहा सदस्य यातून समोर आले असले तरी आणखी सहा सदस्यांची नाव समोर येणं बाकी आहे. यावरचा पडदा येत्या २ तारखेलाच उघडणार असल्याने प्रेक्षक या दिवसाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.