मन उडू उडू झालं या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडल्या आहेत. सानिका आता तिच्या सासरी राहायला गेली आहे. मात्र सासरी गेल्यानंतरही ती तिच्या कुरघोड्या अधिकच वाढवत चालली आहे. इकडे दीपा आणि इंद्राच्या प्रेमाची खबर तिच्या आईला लागली आहे. त्यामुळे दिपूची आई तिच्यावर प्रचंड नाराज झाली आहे. देशपांडे सरांनी आपली तत्व कायम जपली आहेत, मात्र आपल्या पाठीमागे आपली लाडकी मुलगी दिपू इंद्राच्या प्रेमात गुंतलेली आहे. हे जेव्हा त्यांना समजेल तेव्हा ते या लग्नाला परवानगी देणार की नाहीत हे येत्या काही दिवसातच मालिकेतून उलगडेल.
मात्र मन उडू उडू झालं या मालिकेत शलाकाच्या बाबतीत जे काही अनपेक्षित दाखवण्यात आले आहे त्यावर प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी दर्शवली आहे. स्वतःच्या लग्नात सासरकडची मंडळी वाटेल ती मागणी करत होते तरीदेखील शलाका गप्प राहिलेली पाहायला मिळाली. अमेरिकेतला नवरा मिळेल या एका हव्यासापोटी देशपांडे कुटुंब त्यांच्या मागण्या मान्य करत राहिले. एवढे म्हणून कमी की काय आता या मालिकेत शलाकाचा छळ दाखवण्यात आला आहे. सासू आणि नवऱ्याच्या कट कारस्थाना पुढे शलाका एवढी हतबल का दाखवली आहे हे न उमजणारे कोडे आहे. गप्प राहून आपल्या सासरकडच्या लोकांच्या चुका ती समोर का आणत नाही? असा प्रश्न आता प्रेक्षक करू लागले आहेत.

शलाका शिकलेली मुलगी आहे, योग्य वाईट आता आजकालच्या सगळ्याच मुलींना चांगले समजले आहे. नवऱ्याच्या चुका लपवून ठेवणे हुंडा मागणे या गोष्टीतून मालिका काय साध्य करू पाहत आहे असा संतप्त सवाल प्रेक्षक करत आहेत. शिवाय शलाकाचे सततचे रडणे कंटाळवाणे वाटू लागले आहे. अर्थात ही कथानकाची एक गरज असली तरी देखील एका आदर्श शिक्षकाची मुलगी म्हणून शलाकाने तिचे अस्तित्व, तिचा स्वाभिमान जपला पाहिजे अशी एक माफक अपेक्षा आहे. नवऱ्याचे पहिले लग्न झाले आहे, हे आता शलाकाला समजले आहे. शलाकाच्या मनातली घालमेल ती दिपूला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दिपूला हे समजणार का? ती शलाकाला या संकटातून कशी सोडवणार हे मालिकेतून लवकरच पाहायला मिळणार आहे.