ती बोलली तरी त्याला त्रास होतो आणि ती नाही बोलली तर तो अस्वस्थ होतो. असं गोड नातं असलेल्या समीर आणि शेफाली यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत यश आणि नेहा यांच्यातील प्रेमाचे बंध जुळले. इकडे समीर आणि शेफाली यांचंही जुळावं याकडे प्रेक्षक लक्ष लावून बसले आहेत. तसंही शेफालीने यापूर्वी समीरला छोटया छोट्या गिफ्ट दिल्या आहेत. पण समीरने त्या घेतल्या नव्हत्या. यावेळी मात्र शेफालीने एक खास गिफ्ट समीरला दिलीय आणि या गिफ्टवरून ऑफीसमध्ये चेष्टा होऊनही समीरने ती गिफ्ट घेतली आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील नायिका नेहाची मैत्रीण शेफाली आणि नायक यशचा मित्र समीर यांच्यात गेल्या काही एपिसोडमध्ये जवळीक वाढत असल्याचं दिसत आहे. आणि हा ट्रॅक प्रेक्षकांनाही आवडत आहे. खरंतर शेफाली समीरवर लट्टू आहेच, पण समीर मात्र तिला हलक्यात घेत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून समीरच्याही मनात शेफालीचा विचार आला की गुदगुल्या होत आहेत. त्यांच्या प्रेमाची गाडी आता पुढच्या स्टेशनवर नेण्यासाठी शेफालीच्या आईचीही मालिकेत एन्ट्री झाली आहे. समीरच्या हातात एक गुलाबी रंगाचा, मुलींना शोभेल असा फोन आहे. त्यावरूनच समीरची चेष्टा सुरू झाली. तो फोन समीरला अजिबात शोभत नाही.
त्यामुळे तो फोन त्याने कुणाला तरी द्यावा आणि नवीन फोन घ्यावा अशा कलिगच्या सूचना आहेत. पण शेफालीने गिफ्ट दिलेला तो फोन समीरला आवडलाय. त्यामुळे गिफ्ट कुठल्या रंगाची आहे. त्याची किंमत काय आहे यापेक्षा देणाऱ्याची भावना काय आहे हे जास्त महत्वाचं आहे म्हणत समीर तो फोन आपल्याजवळ ठेवतो. हे सगळं बोलत असताना समोर उभ्या असलेल्या शेफालीकडे पहायला तो विसरत नाही. शेफालीला काय कळायचे ते कळते. मुळात शेफालीच्या नेहमीच्या गोंधळात धक्का लागल्याने समीरचा फोन पाण्यात पडल्यानेच शेफालीने समीरला फोन गिफ्ट दिलाय. आता या फोनच्या निमित्ताने समीर शेफाली यांचं कनेक्शन जुळणार हे नक्की.