मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या नावाचा दबदबा असणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक निर्माते आणि अभिनेते महेश मांजरेकर आपल्या रुबाबदार व्यक्तिमत्व, बाणेदार आवाज आणि रोखठोक अभिनय शैलीमुळे प्रसिद्ध आहेत. अनेक हिंदी तसेच मराठी मालिका, चित्रपटातून काम केलेल्या महेश मांजरेकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीला वेगळ्या उंचीवर नेण्याचे श्रेय द्यायला हवे. यामध्ये प्रामुख्याने मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, नटसम्राट, फक्त लढा म्हणा, पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित भाई, काकस्पर्श, शिक्षणाच्या आईचा घो या सारख्या दर्जेदार मराठी सिनेमांचे दिग्दर्शन, पटकथा, निर्मिती अशा विविध प्रकारे योगदान दिले आहे.
अभिनेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना मूत्राशयाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या झाली असून पुढील आरामासाठी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे; घरी देखील त्यांची विशेष काळजी घेतली जाईल खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांच्या प्रकृती मध्ये लवकरात लवकर सुधार होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. संजय दत्त फेम वास्तव सिनेमातून महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून पदार्पण केले होते, त्यानंतर प्रदर्शित झालेला काटे सिनेमामुळे मांजरेकर यांना खरी ओळख मिळाली. Oscar पुरस्काराने गौरविण्यात आलेला स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातही महेश यांनी महत्वाची भूमिका साकारली. महेश मांजरेकर यांचे चिरंजीव सत्याने FU या मराठी चित्रपटातून सिनेजगतात पदार्पण केले; सैराट फेम आकाश ठोसरचीही या चित्रपटात महत्वाची भूमिका होती परंतु हा चित्रपट लोकांना भावला नाही, त्यामुळे सत्याला स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत.
मोठ्या पडद्यावर आपला ठसा उमठवत असताना टेलिव्हिजन जगतातही महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन केले आहे. लवकरच ते बिग बॉस मराठी सिझन ३ मध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. याशिवाय स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित बायोपिक १३८ व्या जयंती दिनानिमित्त जाहीर करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटाच्या निर्मिती संदर्भात ते पुढील काही काळ व्यस्त असणार आहेत. स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक अशा देशभक्ताची भूमिका कोण साकारणार आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली देशभक्तीपर गीते विशेष आकर्षण ठरणार आहे.