प्रत्येक मोठ्या कलाकाराला यशाच्या शिखरापर्यंत पोहचण्यासाठी अतिशय मेहनत आणि पुढ्यात आलेल्या अगणित अडीअडचणींना तोंड द्यावेच लागते.. आणि असे मिळालेले यश आयुष्यात इतके काही शिकवून जाते कि पुन्हा कोणत्याही परिस्थितीला हसत खेळत तोंड देता येते.अशा यशस्वी नायकांमध्ये आपल्या सर्वांचा लाडका विनोदसम्राट “भाऊ” कदम याचा देखील समावेश होतो.. भालचंद्र हे मूळ नाव फार लांबलचक आणि थोडेसे खेडवळ वाटल्यामुळे त्याने करिअरच्या सुरुवातीपासूनच भाऊ असे प्रेमाचे टोपण नाव धारण केले. भाऊची घरची परिस्थिती बेताचीच होती. वडील भारत पेट्रोल पंपावर काम करायचे, आई गृहिणी आणि लहान भाऊ श्याम असे चौघांचे कुटुंब घराला उभे करण्याचा पुरेपूर खटाटोप करत होता. आई वडीलानी तसेच गुरुजनांनी भाऊला यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली होती, खोडकर आणि रोखठोक वृत्तीचा भाऊ शाळेत असल्यापासूनच प्रसिद्ध होता. शाळेत असताना भाऊ नियमित सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा, मिळेल ते काम करत तो अभिनयाचे नवनवीन धडे घेत होता.
काही वर्षातच भाऊच्या वडिलांचे निधन झाले आणि कुंटुंबाची पूर्ण जबाबदारी भाऊच्या खांद्यावर येऊन पडली, हलाखीचीपरिस्थिती भाऊला नाटक क्षेत्रापासून हळूहळू दूर घेऊन चालली होती. घरचा खर्च आणि शिक्षण त्यासोबतच नाटकातील काम असा वेळेचा बिकट प्रश्न त्याच्यापुढे तयार झाला होता. नाटकांमध्ये काम करून घरचा खर्च देखील पूर्ण होता नव्हता, अशा हलाखीच्या दिवसात भाऊच्या मनात कलाक्षेत्र सोडण्याचा वारंवार विचार येऊ लागला. घरखर्च चालवण्यासाठी मित्रांच्या मदतीने कशी बशी नाईलाजास्तव पान टपरी सुरु केली. काबाड कष्टाचे दिवस सरता सरत नव्हते. बराच काळ लोटला होता, आता परिस्थिती थोडीशी बदलत होती पण अंतःकरणातील नट काही केल्या शांत बसू देत नव्हता.. नाटकांचे पोस्टर पाहून त्याला पुन्हा कला क्षेत्रात जावेसे वाटायचे पण स्वतःच्या सावळ्या रंगामुळे नायकाच्या भूमिका मिळतील का याची शाश्वती नव्हती आणि पुन्हा हिरमुड व्हायचा. असेच दिवस जात होते आणि एक देव माणूस भल्या पहाटेच त्यांच्या घरी आला, त्याचे नाव होते सुप्रसिद्ध प्रोड्युसर दिग्दर्शक विजय निकम आणि त्या दिवसापासून भाऊंचे आयुष्यच बदलून गेले..
आजवरची कारकीर्द पाहता निकम साहेब विनोदी भूमिकेसाठी काही चेहरे शोधत होते तेव्हा त्यांना भाऊची आठवण झाली, म्हणून ते थेट घरी पोहोचले. त्यांनी भाऊला त्यांच्या आगामी नाटकाची पूर्ण कल्पना दिली, त्यावेळी व्यावसायिक नाटकांचे सुगीचे दिवस चालले होते आणि हि संधी यशस्वी होण्यासाठी पुरेशी होती. निकम साहेबांना भाऊवर पूर्ण विश्वास होता म्हणून त्यांनी काम करण्यासाठी शब्द टाकला. बरीच चर्चा झाली भाऊने घरची सर्व परिस्थिती सांगितली पण निकम साहेबांच्या हट्टापुढे भाऊला काही करता आले नाही आणि या अवलिया नटाला पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली. दारात चालून आलेली हि सुवर्णसंधी भाऊ सोडू शकला नाही आणि आपले सर्वस्व पणाला लावून तो भूमिका करत राहिला..
रसिक मायबाप भाऊच्या अभिनयावर फिदा होत गेले, सहजरित्या केलेले विनोद प्रेक्षकांच्या मनाला भिडत होते.. प्रत्येक प्रयोगागणिक भाऊ रसिकांच्या हृदयात स्थान मिळवत गेला. त्यानंतर भाऊला झी मराठी चॅनल वरील ‘फू बाई फू’ या विनोदी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. रंगभूमीवर काम करणाऱ्याला टेलिव्हिजन जगत फारसे भुरळ घालत नाही, रंगमंचाची जादूच तशी न्यारी असते.. आणि साहजिकच झालेही तसेच, भाऊने नव्याने मिळालेली हि संधी नाकारली. या गोष्टीला भाऊंच्या घरून बराच विरोध झाला.. पत्नी ममता आणि भाऊ श्याम तसेच मुलगी मृण्मयी यांनी भाऊला समजावण्याचा भरपूर प्रयत्न केला.. आणि अखेर भाऊ व्यावसायिक रंगभूमी सोडून टेलिव्हिजनच्या रंगीबिरंगी दुनियेत प्रवेश करायला तयार झाला.
फु बाई फु च्या जवळजवळ ९ पर्वातील ५०० हुन अधिक भागांमध्ये भाऊने लिलया काम केले; दोन पर्वांमध्ये त्याने विजेते पद देखील मिळवले होते.. आणि आश्चर्य म्हणजे दोन्हीही वेळेस सुप्रसिद्ध सुप्रिया पाठारे हीच त्याची जोडीदार होती.आयुष्यातील हलाखीचे दिवसच जणू भाऊला अंतःकरणातून प्रेरणा देत होते. भाऊ स्वतःला पूर्णतः झोकून काम करत राहिला. शालेय जीवनातील अभिनयाच्या रोपट्याचे आता विशाल वटवृक्षात रूपांतर झाले. प्रेक्षकांनी तर भाऊला अक्षरशः डोक्यावर घेतले; कोणत्याही दौरयावर भाऊच्या नुसत्या प्रवेशावरच टाळ्यांचा कडकडाट होतो . भाऊची विनोदी शैली आहेच तशी अगदी भुरळ घालणारी, निखळ आणि साधी भोळी.
डॉक्टर निखिल साबळे फु बाई फु च्या यशानंतर एक आगळा वेगळा कार्यक्रमाची आखणी करत होता, सोबत होती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याची. कलाकारांची टीम तयार होती पण मालिकेला वेगळेपण हवे होते आणि प्रेक्षकांच्या आवडीचाही विचार करायचा होता. नितीन केणी यांनी निर्मात्याची जबाबदारी स्वीकारली आणि उदयास आली “चला हवं येऊच द्या” ही मालिका. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन निलेश साबळे करतो तर ह्या तुफान विनोदी मालिकेत प्रमुख भूमिकेत भाऊ कदम, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, सागर कारंडे आणि भारत गणेशपुरे तर योगेश शिरसाट, अंकुर वाढवे, स्नेहल शिदम, शशिकांत केरकर, मानसी नाईक, उमेश जगताप, अरविंद जगताप हे सहकलाकार असून रमेश वाणी, विनीत भोंडे, संदीप रेडकर यांनीही खारीचा वाटा उचलला आहे. वर्ष २०२० च्या दिवाळी पासून मराठी चित्रपट सुपरस्टार स्वप्नील जोशी परीक्षक म्हणून लाभला तर अलीकडच्या काही भागात त्याने स्वतः भाऊ आणि टीम सोबत अभिनयाचा उच्चांक गाठला आहे.
मधल्या काळात बरेच चित्रपट भाऊनी पदरात पडून घेतले, यूंतू, झाला बोभाटा, रंजन, हाफ तिकीट, जाऊद्या ना बाळासाहेब, वाजलाच पाहिजे, टाइम बरा वाईट, सायकल, टाईमपास २, मिसमॅच, सांगतो ऎका, बाळकडू, टाईमपास, आलटून पालटून, नारबाची वाडी, एक कटिंग चाय, कोकणस्थ, कुटुंब, गोळाबेरीज, फक्त लढ म्हणा, वेडींगचा शिनेमा, हरिश्चंद्राची फॅक्टरी, डोंबिवली फास्ट अशा विविध चित्रपटांमधून भाऊने लीलया काम केले आणि प्रेक्षकांची विशेष विनोदवीर म्हणून पसंती मिळवली. सामान्य परिस्थितीवर मात करून भाऊने स्वतःचे तयार केलेले भावविश्व रसिक जणांनी अंतःकरणातून स्वीकारले आहे, त्याची सहज विनोदशैली अफलातून आहे. लेखात काही चुकले असल्यास भाऊची माफी मागत थांबत आहे.. भाऊ असाच यशाची नवनवीन शिखरे गाठत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि भविष्यासाठी शुभेच्छा. आपल्या भाऊची हि छोटीशी कहाणी तुम्हाला आवडली असेल तर मित्र मंडळींना वाचण्यासाठी शेअर करायला विसरू नका. विनोदवीर भाऊ आणि वाचक प्रेक्षकांचे मनःपूर्वक धन्यवाद. लोभ असावा..