दिवाळी म्हटलं की फराळ, मातीचे किल्ले बनवणं आणि फटाक्यांची आतिषबाजी यांचं एक अतुट नातं आहे. दिवाळी, भाऊबीज निमित्तची सुट्ट्यांमधील हि आनंदची उधळण कलाकार मंडळी उत्साहाने साजरी करतात. अभिनेता अंकुश चौधरीने लहान मुलांना किल्ल्याचं महत्व समजावं म्हणून; आपल्या फ्लॅटच्या छोट्याश्या गॅलरीत मातीचा किल्ला बनवला. खरं तर शहराच्या ठिकाणी ह्या गोष्टी आता जागे अभावी खूप कमी जोपासलेल्या पाहायला मिळतात, मात्र आपली संस्कृती आणि गडकिल्ल्यांचे महत्व अशाच माध्यमातून बालमनावर रुजवल्या जाव्यात ही त्याची प्रामाणिक ईच्छा होती. आणि म्हणूनच लाडक्या प्रिन्ससाठी अंकुश आणि दिपाने किल्ला तयार केलेला दिसला.

विविध माध्यमातून सेलिब्रिटी आपल्या दिवाळीच्या अनेक आठवणींना उजाळा देत असतात. लहानपणी आपण सर्वांनीच फटाके वाजवले आहेत. पण त्यातले सगळेच फटाके फुटत नसतात हे तुमच्या लक्षात आलेले असते. अशाच न फुटलेल्या, वात नसलेल्या फटाक्यांची दारू काढून ती अनेकांनी गोळा केली असेल. अशीच गंमत कुशलने देखील आपल्या बालपणी केलेली होती. या गमती आजही तो प्रत्यक्षात अनुभवतो आहे हे तो सांगायला विसरत नाही. आपल्या धमाल उडवून देणाऱ्या आठवणीत रमलेला कुशल म्हणतो की, ही एक खोडी मला बालपणापासून आहे. वात नसलेले आणि न पेटलेले फटाके गोळा करायचे आणि त्यातली दारू एकत्र करुन पेटवून द्यायची. त्याशिवाय माझी दिवाळी कधीच पूर्ण झाली नाही.

आज इतकी वर्ष गेली पण माझी ही सवय काही गेली नाही. मला वाटतं, दिवाळीचा फराळ संपल्यानंतर डब्बे नीट तपासून पाहिले; तर तुकड्या तुकड्यात चकली, शंकरपाळ्या सापडतात ना! डब्याच्या तळाशी करंजीचं सारण आणि अनारस्याच्या खसखस मध्ये मिसळलेला जरासा चिवडा सापडतोच ना! तसंच आपण कितीही मोठे झालो तरी आपल्यात उरलेलं थोडसं बालपण आपल्याला सापडतंच! फक्त डबे नीट तपासून घ्यायला हवेत. तळाशी कुठेतरी असतंच हे बालपण; अगदी लाडवातल्या मनुक्या एवढं का होईना, ते आपल्यात उरतंच. बालपणीच्या ह्या गोड आठवणी तो आता देखील तेवढ्याच उत्स्फूर्तपणे अनुभव घेत आहे. प्रत्येकाच्या मनात एक लहान मूल दडलेलं असतं असाच काहीसा अनुभव कुशलने मांडला आहे.