सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेने गेल्या काही दिवसांपूर्वी लीप घेतला आहे, त्यामुळे मालिकेत बरेचसे बदल घडून आलेले दिसले. अभिमन्यूच्या पश्चात लतिका आपल्या लेकीचा सांभाळ करत आहे. मात्र आदिराला सांभाळताना तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दौलतचे पात्र तिच्या सुरळीत चाललेल्या जीवनात आडकाठी ठरत आहे. लतिका आणि आदिराच्या मदतीसाठी एका पात्राची एन्ट्री करण्यात आली आहे. अभिमन्यूची जागा भरून काढण्यासाठी हे पात्र लतीकाच्या मनात जागा बनवताना पाहायला मिळणार आहे. मालिकेत लवकरच हा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आदिराला एका मंदिरात देवा भेटतो, इथेच आदिराची देवा सोबत गट्टी जमते.

हे पात्र साकारले आहे चित्रपट, मालिका अभिनेता कुणाल धुमाळ याने. काही व्यावसायिक जाहिरातीं मधूनही तो झळकला आहे. औरंगाबाद येथे शालेय शिक्षण घेतलेल्या कुणालने एमबीए आणि बीईची पदवी मिळवली आहे. दशमी क्रिएशन्सप्रायव्हेट लिमिटेड मध्ये त्याने काही काळ असिस्टंट क्रिएटिव्ह डायरेक्टरचे काम पाहिले. अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती, यातूनच अलबत्या गलबत्या या गाजलेल्या नाटकातून त्याने राजाची भूमिका साकारली. त्यानंतर मराठी चित्रपटांसाठी त्याने ऑडिशन देण्याचे ठरवले. शेंतिमेन्टल, पावनखिंड, शेर शिवराज अशा चित्रपटातून महत्वाच्या भूमिका साकारण्याची कुणालला संधी मिळाली. सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली मालिकेनंतर त्याला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकण्याची नामी संधी मिळत आहे.

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत तो देवाची भूमिका साकारत आहे. लतिका आणि आदिरासाठी हा देवा एक देवदूतच बनून आला असल्याने मालिकेच्या प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिमन्यू या मालिकेत नसल्याने प्रेक्षक काहीसे नाराज झाले होते. समीर परांजपे मराठी बिग बॉसमध्ये सहभागी होणार अशी चर्चा होती. याचकारणामुळे त्याची मालिकेतून एक्झिट करण्यात आली असे सांगण्यात येत होते. बिग बॉस चौथ्या पर्वाचा ग्रँड प्रीमिअर सोहळात समीरचा सहभाग नसल्याचे पाहून चाहत्यांचा हिरमोड झाला. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे तो बिग बॉसच्या घरात दाखल होईल असेही बोलले जात आहे. येत्या काही दिवसात याबाबतच्या शक्यता अधिक स्पष्ट होतील तोवर देवाच्या एंट्रीने मालिकेला वेगळे वळण लागणार हे नक्की.