संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि प्रसाद ओक दिग्दर्शित तू म्हणशील तसं हे नाटक साधारण दीड वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या नाटकात आदिती आणि गौरव अशा दोन भिन्न स्वभावाच्या नवरा बायकोची धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अदिती ऑफिसमध्ये गौरवची बॉस असते. मात्र वेंधळा गौरव घरी तिच्याशी जसा वागतो तसाच तो ऑफिसमध्ये सुद्धा वागतो. त्याने धांदरटपणा करू नये, व्यवस्थित वागावं असा ती नेहमी प्रयत्न करत असते. मात्र गौरव घरी जसा आहे तसाच वागत असल्याने दोघांमध्ये धमाल उडवून जाते. हे नाटक रंगभूमीवर आल्यापासून प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. महाराष्ट्रभर या नाटकाचे रेकॉर्ड ब्रेक दौरे झाले.
संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई यांची जुळून आलेली केमिस्ट्रीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. मात्र आता नाटकातून भक्ती देसाई हिने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे हे नाटक पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यासाठी अदितीच्या पात्रासाठी एका नव्या नायिकेची शोधाशोध सुरु होती. भक्ती देसाई हिने आजवर अनेक मालिका, नाटक तसेच चित्रपटातून काम केले आहे. प्रसिद्ध संवाद लेखक, अभिनेता अव्दैत दादरकर याची ती पत्नी आहे. मधल्या काळात मुलीच्या जन्मानंतर भक्तीने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. मात्र मुलगी मोठी झाल्यावर तिने पुन्हा मालिका, नाटकातून पुनरागमन केले. तू म्हणशील तसं या नाटकासाठी तिची निवड करण्यात आली. नाटकाचे यशस्वी प्रयोग पार पडत असतानाच भक्तीने हे नाटक सोडलेलं पाहायला मिळालं.
अद्याप तिने यामागचे कारण स्पष्ट केले नसले तरी, नाटकात तिची भूमिका आता अभिनेत्री काजल काटे साकारणार आहे. काजलने माझी तुझी रेशीमगाठ या लोकप्रिय मालिकेतील शेफालीची भूमिका गाजवली होती. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेताच काजलने तू म्हणशील तसं या नाटकाचा सराव करण्यास सुरुवात केली. उद्या २५ फेब्रुवारी पासून पुन्हा रंगभूमीवर येत असलेल्या या नाटकातून आता आदीतीची भूमिका काजल साकारणार आहे. नाटकाचे नवे पोस्टर नुकतेच संकर्षणने शेअर केले आहे. ज्यात भक्ती ऐवजी आता काजल काटे झळकत आहे. त्यामुळे भक्तीने हे नाटक का सोडले असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तूर्तास संकर्षण आणि काजल काटे जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.