सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माऊली’ या मालिकेला आता रंजक वळण आलेले पाहायला मिळत आहे. आईवडिलांच्या पश्चात त्यांच्या मुंजीसाठी शुद्ध पत्र मिळवण्यासाठी संत ज्ञानेश्वर आपल्या भावंडांसोबत पैठणला गेले आहेत. पैठणच्या धर्म पंडितांसमोर ज्ञानेश्वर माउलींनी आपली हकीकत सांगून त्यांना प्रश्न विचारले आहेत आणि मला न्याय द्यावा अशी मागणी केली आहे. ही चर्चा चालू असताना मात्र अनेकांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणण्यावर आक्षेप घेतले. नाग घाटावर रेड्याच्या मुखी वेद वदवून घेतल्याचा क्षण आता ह्या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
त्यामुळे या मालिकेची उत्कंठा वाढलेली पाहायला मिळते आहे. या मालिकेचा रविवारी विशेष भाग प्रसारित करण्यात आला होता. त्यात माउलींनी केलेला पहिला चमत्कार छोट्या पडद्यावरून अनुभवायला मिळत आहे. मालिकेत अभिनेते समीर धर्माधिकारी यांनी देखील नुकतीच एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. तर ज्ञानेश्वर माऊलींची भूमिका अभिनेता वरुण भागवत याने आपल्या अभिनयातून तितक्याच ताकदीने प्रेक्षकांसमोर उभी केली आहे. ज्ञानेश्वर माउली व त्यांच्या भावंडांना धर्मात परत घेण्यासाठी प्रमाण म्हणून पैठण येथील धर्म सभेचे शुध्दीपत्रक मागितले. ही भावंडे पैठण धर्म सभेमध्ये गेले असताना त्यांना अनेक सत्वपरिक्षांना तोंड द्यावे लागल्याचे मालिकेतून दाखविले जात आहे. वाकोबा नावाचा स्थानिक कोळी आपल्या गेनोबा नावाच्या रेड्यास घेऊन जात असताना धर्म सभेतील एका धर्म पंडिताने माउलींना त्या रेड्याचा तुझा आत्मा एकच आहे का?
आणि हे सिध्द करुन दाखविण्यास सांगितले, यावर माऊलींनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून वेद उच्चारण्याची आज्ञा केली. रेड्याच्या मुखातून ऋग्वेदाच्या श्रुती ॐ अग्नीमुळे पुरोहित यज्ञस्य देवं मृत्विजम, घेतार रत्न धाततम, पशुमुखे वेदाच्या श्रुती, वाढवा किर्ती तुमचीये उच्चारल्या गेल्या. हा अलौकिक सोहळा नुकताच मालिकेत पार पडला आहे. नेवासे मंदिरातील खांबाला टेकून वागयज्ञ अर्थात ज्ञानेश्वरीचे लेखन केले. आज पुरातन मंदिरातील एक खांब शिल्लक राहिला असून त्यालाच श्रद्धेने पैस मंदिरात रूपांतरित करण्यात आले आहे. पुढील प्रवासात माउली, निवृत्तीनाथ, सोपानदेव व मुक्ताई, रेडा व वाकोबा कोळी हे सर्वजण आळे गावाच्या उत्तरेस संतवाडी येथे पोहोचले. या ठिकाणी रेड्याने माउलींकडे येथेच समाधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. ज्ञानदेवांनी पुढील भविष्य जाणुन शके १२१२ माघ वद्य त्रयोदशी या दिवशी स्वहस्ते या रेड्यास समाधी दिली.
या चारही भावंडांच्या पदस्पर्शाने पावन झालेली महाराष्ट्रातील ही एकमेव समाधी आहे. पंढरपूर आळंदीची आषाढी वारी चुकल्यावर वारकरी आळ्याची वारी करुन पुण्य पदरात पाडतात. आजही रेडेश्वर समाधीला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक एकादशी निमित्त दर्शनासाठी गर्दी करतात. या मालिकेतील उत्तम कलाकारांमुळे घडणाऱ्या घटनांची उत्कंठा दिवसेंदिवस वाढत आहे. पैठण धर्मपीठाच्या निर्णयानंतर या भावंडांसमोर येणाऱ्या समस्यांना ते कसे सामोरे जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अध्यात्मिक मालिकेतून अद्भुत गोष्टींचे दर्शन घडविणाऱ्या सर्व कलाकारांचे आणि निर्माते चिन्मय मांडलेकर, दिगपाल लांजेकर, स्निग्धा गोसावी, शंतनू हेर्लेकर यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा.