द काश्मीर फाईल्स हा बहुप्रतिक्षित चित्रपट १४ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून काही दिवसांपूर्वी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र कोर्टाने विवेक अग्निहोत्री यांच्या बाजूने निकाल देत याचिकाकर्त्यांची चित्रपटाबाबतची स्थगिती फेटाळून लावली आहे. त्यामुळे द काश्मीर फाईल्स चित्रपटाच्या टीमने आनंद व्यक्त केला आहे. माझ्या चित्रपटात कुठलाही मोठा कलाकार नाही म्हणून चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माने नकार दिला होता. असा आरोप विवेक अग्निहोत्री यांनी लावला होता. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांनी हा खुलासा करताच प्रेक्षकांनी कपिल शर्माला धारेवर धरले होते, त्याच्या विरुद्ध संताप व्यक्त केला जात होता. शिवाय त्याचा शो बंद व्हावा अशीही जोरदार मागणी होऊ लागली होती.
मात्र यावर कपिल शर्माने मौन सोडलेले पाहायला मिळत आहे. आपल्यावर होत असलेले आरोप आणि टीका पाहून त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडण्यास सुरुवात केली आहे. कुंवर राठोड या नेटकऱ्याने विचारलेल्या एका प्रश्नावर कपिल ने उत्तर दिले असून यात तो म्हणतो की, ‘हे खरं नाही राठोड साहेब, तुम्ही विचारलंत म्हणून सांगितलं. ज्यांनी या गोष्टींवर विश्वास ठेवला आहे त्यांना अधिक स्पष्टीकरण देण्यात काय फायदा. सोशल मीडियावरील अनुभवावरून सूचित करतो की, सोशल मीडियाच्या जगतात कथेची एकच बाजू जाणून घेऊन त्यावर विश्वास ठेवू नका, धन्यवाद. अर्थात कपिल शर्माने जरी याबाबत खुलासा केला असला तरी नाण्याची दुसरी बाजू नेमकी काय आहे ह्याचेच स्पष्टीकरण दिले नसल्याने त्याच्यावर टीका करण्यात आली आहे.
जर असे खरेच काही कारण असेल नाण्याची दुसरी बाजू असेल, तर ती त्याने स्पष्ट करायला हवी होती. दरम्यान द कपिल शर्माच्या शोने चित्रपटाच्या प्रमोशनला नकार दिला असला तरी, मराठी सृष्टीने या चित्रपटाच्या प्रमोशनची जोरदार तयारी केलेली पाहायला मिळाली. चित्रपटाची कलाकार मंडळी चला हवा येऊ द्या, मराठी इंडियन आयडल सारख्या शोमध्ये दाखल झाली होती. उद्या द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशी आणि मृणाल कुलकर्णी तसेच अभिनेता चिन्मय मांडलेकर विशेष भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.चित्रपटाच्या प्रमोशनला जेवढा विरोध झाला त्याहून तो थिएटर्समध्ये प्रेक्षकांची अधिक गर्दी खेचून आणेन अशी खात्री वाटत आहे.