चला हवा येऊ द्या या शोमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला कुशल बद्रिके त्याच्या दिलखुलास गप्पांमुळे नेहमीच चर्चेत येत असतो. पांडू चित्रपट दिग्दर्शक विजू माने आणि कुशल बद्रिके यांची मैत्री किती अतूट आहे हे तो नेहमी सांगतो. अगदी स्ट्रगलच्या काळात विजू माने आणि कुशल बद्रिके यांनी एकमेकांना साथ दिली होती. एवढेच नाही तर कुशल आणि सुनायनाच्या प्रेमकहाणी पूर्णत्वास येण्यास विजू माने यांचाही मोलाचा वाटा होता. तू धाडस कर मी तुझ्या पाठीशी आहे असे ते कुशलच्या कामात नेहमी प्रोत्साहन देत राहिले. कुशलच्या कामात त्याला नेहमी साथ देणारे किमयागार विजू मानेच आहेत. रात्री अपरात्री कधीही हाक मारली तरी त्या हाकेला ओ देणारा.
अगदी हक्काचा माणूस असा विजू माने आणि कुशल एकमेकांना पूरक आहेत. पांडू चित्रपट बनवण्यापासून कुशल विजू मानेंसोबत होता. आणि या चित्रपटात देखील तो एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. मला घेऊन एक चित्रपट काढ असे तो विजू मानेना हक्काने सांगू शकतो इतकी त्यांची मैत्री घट्ट बनली आहे. आज विजू माने यांचा वाढदिवस, याचे औचित्य साधून कुशलने हटके शुभेच्छा देत आपल्या हक्काच्या माणसाबद्दल भरभरून लिहिले आहे. मी लिहिलेल्या ओळींमध्ये ज्यांना कधीच “गाणं” दिसत नाही, पण त्या ओळींची आज ना उद्या एखादी “कविता” होईल प्रयत्न करत रहा कुश्या! असं कायम प्रोत्साहन देणाऱ्या मित्राचा आज बर्थडे. मी घर घेण्यापासून, ते घरातला बल्प गेलाय तो बदलून द्या पर्यंत.
आणि “सिनेमाच्या प्रीमियरला” घालायला कपडे घेऊन द्या, पासून ते कपडे दिलेत! आता मला घेऊन “सिनेमा” करा आणि त्याचा “प्रीमियर” करा पर्यंत मी ज्यांच्याकडे काहीही मागू शकतो. अशी एक हक्काची जागा म्हणजे “विजू माने”. कधी कधी तर मला वाटतं “विजू माने” उर्फ “विमा” देवाने हा माझ्या आयुष्यभराचा “विमा” आधी काढला मग मला जन्माला घातलं. फक्त “प्रेमाचं” प्रिमीयम मात्र कमी पडू द्यायचं नाही. आपल्या मैत्रीची ही पॉलिसी अशीच बहरत राहू दे, जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी. हिच बाप्पांच्या आणि गुरूजींच्या चरणी प्रार्थना. तटी, आज तुमच्या वाढदिवसानिमित्त कविता करत नाही हेच बर्थडे गिफ्ट समजा.