मराठी चित्रपटांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून आता बॉलिवूड सृष्टीला सुद्धा धडकी भरली आहे की काय असे चित्र सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. कारण ३० डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला वेड हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात धुमाकूळ घालताना दिसत आहे. चित्रपटाला प्रदर्शित होऊन १६ दिवस उलटले आहेत. मात्र आजही तिसऱ्या आठवड्यात प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दाखवला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेला कुत्ते हा बॉलिवूड चित्रपट वेड चित्रपटापुढे सफसेल आपटला आहे. बॉलिवूड सृष्टीला उतरती कळा येऊ लागल्याची चिन्ह समोर आली आहेत.
वेड चित्रपटाने विकेंडमध्ये भरघोस प्रतिसाद मिळवला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या वीकेंडला थोडा कमी प्रतिसाद मिळाला असला तरी शनिवारी चित्रपटाने तब्बल २ कोटी ७२ लाखांचा गल्ला आपल्या खात्यात जमवला आहे. वेड चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २० कोटींचा टप्पा पार केला तर दुसऱ्या आठवड्यात एकूण ३५ कोटींचा गल्ला या चित्रपटाला मिळवता आला. गेल्या रविवारी एकाच दिवसात चित्रपटाने ५ कोटी ७० लाखांची कमाई करत आपलाच रेकॉर्ड मोडीत काढला. दोन्ही वीकेंडला वेड चित्रपटाने जवळपास दहा कोटींची कमाई केली होती. ह्या आठवड्यात शुक्रवारी १ कोटी ३५ लाखांची कमाई केली. तर काल शनिवारी २ कोटी ७२ लाखांची वेडने घसघशीत कमाई केली. वेड चित्रपट आज सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे.
तिसऱ्या आठवड्यातली ही कमाई पाहता हा आकडा वाढलेला पाहायला मिळतो आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या कुत्ते चित्रपटाला अपयश पचवावे लागत आहे. अर्जुन कपूरचा कुत्ते सफसेल फेल ठरला असे म्हणत अनेकांनी बॉलिवूड चित्रपटावर टीका करण्यास सुरुवात केली. अर्थात बॉलिवूड चित्रपटांना बॉयकॉट केले जात असल्याने त्याचा सुद्धा परिणाम अनेक बॉलिवूड कलाकारांना सहन करावा लागत आहे. मात्र याचा फायदा मराठी चित्रपटांना होत असल्याचे चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे. चार दिवसांपूर्वीच रितेश देशमुख, जेनेलिया, जिया शंकर आणि शुभंकर तावडे यांनी चित्रपटाची सक्सेस पार्टी एन्जॉय केली. यावेळी केक कापून हे सेलिब्रेशन साजरे करण्यात आले. यावेळी रितेशने प्रेक्षकांचे आणि मीडियाचे सुद्धा आभार मानले आहेत.