मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता नुकताच जाहीर झाला आहे. प्रेक्षकांनी ज्या स्पर्धकाला सर्वात जास्त पसंती दर्शवली होती तो म्हणजे विशाल निकम. आज बिग बॉसच्या विजेतेपदाची ट्रॉफी विशाल निकम ने जिंकली आहे. दरम्यान टॉप ५ सदस्यांपैकी मीनल शाह बाद झाली होती. बिग बॉसची ट्रॉफी जिंकावी अशी तिची ईच्छा होती त्यामुळे हा निकाल मिनलसाठी धक्कादायक होता. मीनल पाठोपाठ उत्कर्ष शिंदे ने बिग बॉसच्या घरातून एक्झिट घेतली. उत्कर्ष स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे विकास, जय आणि विशाल हे तीन टॉपचे स्पर्धक तिसऱ्या सिजनला मिळाले. बिग बॉसच्या घरातुन विकास पाटील हा स्पर्धक बाद झाला.

आपण ह्या घरातून बाहेर पडलो म्हणून त्याला वाईट वाटलं होतं. मात्र आपला लहान भाऊ बिग बॉस जिंकून येणार अशी आशा त्याने व्यक्त केली होती. शेवट टॉप दोन स्पर्धक म्हणून जय दुधाने आणि विशाल निकम ठरले. या दोघांना एकत्रित पणे बिग बॉसच्या घरातील लाईट्स ऑफ करण्याचा आदेश देण्यात आला. आपापल्या नावाच्या पाट्या घेऊन ह्या दोघांना मंचावर बोलावण्यात आले, त्यावेळी तितक्याच उत्साहाने सगळ्यानी या दोन टॉपच्या स्पर्धकांचे स्वागत केले. विशाल निकम हा बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता घोषित करण्यात आला. त्याला बिग बॉसच्या सिजन ३ ची ट्रॉफी आणि २० लाखांचे बक्षीस देण्यात आले. दरम्यान एवढे दिवस हा शो तग धरून होता, तो महेश मांजरेकर यांच्या नेतृत्वामुळे. त्यामुळे गायत्री दातारने महेश मांजरेकर यांच्या सुत्रसंचालनाच येथे कौतुक केलं होतं.

एक बाप माणूस अशा शब्दात महेश मांजरेकर यांचं झालेलं कौतुक त्यांना भारावून टाकणारं ठरलं. गंभीर आजाराला तोंड देऊन त्यांनी बिग बॉसचा हा सिजन आपल्या सुत्रसंचालनाने उंचावर नेऊन ठेवला होता. त्यांच्या नसण्याची जाणीव एका एपिसोडमधून प्रेक्षकांनी अनुभवली होती. त्यांच्या बोलण्यातली ताकद कोणत्याच कलाकाराकडे नसेल आणि तेच या शोचे सूत्रसंचालक असावेत अशी अपेक्षा प्रेक्षकांनी देखील केली होती. अर्थात बिग बॉसच्या पुढच्या येणाऱ्या प्रत्येक सिजनसाठी त्यांनीच सूत्रसंचालन करावे अशी ईच्छा प्रेक्षक देखील नक्कीच करणार अशी खात्री आहे. विशाल निकम बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला याबद्दल त्याचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
