बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात या घरातील सदस्यांमध्ये ऑल इज वेल काही होताना दिसत नाही. पहिल्या भागापासून भांडण, वाद सुरूच आहे. कोण कुणाला दगड म्हणतो तर कोण मूर्ख म्हणतो. यावरून बिग बॉस मराठीचं चौथं पर्व चांगलंच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घराचा दरवाजा उघडून दीड महिना झाला आहे. या दीड महिन्यात या घरातील १६ सदस्यांपैकी आजपर्यंत पाच सदस्यांना घराबाहेर पडावं लागलं आहे. तर स्नेहलता वसईकर वाइल्ड कार्डएन्ट्रीने आत आली आहे. बिग बॉस शोच्या आठवड्याच्या शेवटी चर्चा असते ती कोणता सदस्य घराबाहेर पडणार याची.
आज दहा वाजता बिग बॉस निर्णय जाहीर करणार असून या आठवड्यातील नॉमिनेशनसाठी बिग बॉसने मोठा निर्णय घेतला आहे जो ऐकून सदस्यांना धक्का बसला आहे. बिग बॉसमध्ये टास्कमध्ये कुणी बाजी मारली, कोणती टीम जिंकली, कोणता सदस्य कॅप्टन झाला याची तर उत्सुकता असते. चावडीवर कोणाची शाळा घेतली जाते हे पाहण्यासाठीही प्रेक्षकांचे डोळे आणि कान नेहमीच या कार्यक्रमाकडे लागलेले असतात. आठवडाभर सदस्य या घरात कसे वागतात त्यावर त्यांना बक्षीस मिळते की शिक्षा हे पाहणंही रंजक असतं. या सगळ्या चढउतारांमध्ये आता वेळ आली आहे ती नॉमिनेशनच्या चक्रव्यूहात असलेल्यांपैकी कोणता सदस्य घराबाहेर जाणार याची. यावेळच्या नॉमिनेशनमध्ये एक नव्हे तर दोन सदस्यांना घराबाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे.
महेश मांजरेकर असं म्हणताना दिसत आहेत की बिग बॉस घरातील सदस्यांपैकी दोघांना आपल्या नावाच्या पाट्या काढून घ्याव्या लागणार आहेत. हा निर्णय का घेण्यात आला आणि ते दोन सदस्य कोण असतील ज्यांचा बिग बॉसच्या घरातील मुक्काम संपले हे पाहण्यासाठी आज रात्री दहा वाजेपर्यंत वाट पहावी लागणार आहे. या आठवड्यातील नॉमिनेशनच्या यादीत किरण माने, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, अमृता देशमुख, तेजस्वीनी लोणारी, यशश्री मसुरकर यांची नावं आहेत. यावर नेटकऱ्यांनी यशश्री बाहेर पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तर किरण, प्रसाद आणि अमृता धोंगडे सेफ असल्याचं म्हटलं आहे. दोन सदस्यांचा मुक्काम संपणार असं बिग बॉसने का म्हटलंय याचा उलगडा आजच्या भागातच होईल.