कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ७६ वा सोहळा जगभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. १६ मे ते २७ मे पर्यंत चाललेल्या या सोहळ्याला भारतीय सेलिब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली आहे. मायकल डग्लस आणि हॅरिसन फोर्ड यांना सोहळ्यात विशेष सन्मानित करण्यात आले. ऐश्वर्या राय, सारा अली खान, मौनी रॉय, मानुषी छिल्लर यांच्यासह भारतीय चित्रपट क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर प्रेक्षकांचे लक्ष्य वेधून घेतले. बहुचर्चित चित्रपटांच्या दिग्गज कलाकारांचे आकर्षक पोशाखांमधील रेड कार्पेट कायम चर्चेचा विषय ठरले आहेत. अगदी सोशल मीडियावर प्रभाव टाकणारे सेलिब्रिटीही कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री करताना दिसले आहेत.
रुही दोसानीपासून रणवीर अल्लाबदियापर्यंत अनेक सोशल मीडिया स्टार्सना रेड कार्पेटवर पोज देताना पाहिले गेले. कान्स हा चित्रपट महोत्सव मानावा का? यावरून आता सेलिब्रिटींनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. कान्सने असे अनेक अनावश्यक आणि अज्ञात लोकांना आमंत्रित केल्यामुळे कान्सने आपले आकर्षण गमावले आहे, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात आली आहे. मराठी सृष्टीतील अभिनेत्रींनी देखील यावर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. अभिज्ञा भावे हिने देखील हा मुद्दा उपस्थित केला होता, त्यापाठोपाठ आता अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिनेही या मुद्द्याला अनुसरून एक पोस्ट शेअर केलेली पाहायला मिळते. कान्स हा चित्रपट महोत्सव आहे तितकाच ब्रँड्सचा प्रचार करण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
आपल्या ब्रँडची जाहिरात करताना मनात येणारा पहिला चेहरा म्हणजे इन्फ्लुइन्सर म्हणजेच सोशल मीडिया स्टार होय.या स्टारपैकी बरेच प्रभावी चेहरे त्यांना पाठवलेल्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करतात. रणवीर अल्लाबदिया आणि मासूम मिनावाला यांना ब्रुट इंडियाने पाठवले होते. डॉली सिंगला ब्रुट आणि अजियो यांनी पाठवले होते. पण ज्यांचा चित्रपटांशी दूरूनही संबंध नाही अशा लोकांना तुम्ही तिथे का बोलावता. मुळात आमच्यासारखे प्रसिद्ध चेहरे असताना तुम्हाला या नवीन चेहऱ्यांची गरज का भासते? असा प्रश्न मराठी सेलिब्रिटींनी देखील विचारण्यास सुरुवात केली आहे. इथे आणखी एक मुद्दा असा आहे की या सेलिब्रिटींचा कान्सला विरोध नाही, मात्र त्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याला आमचा विरोध आहे असे या कलाकारांचे म्हणणे आहे.