४ जून रोजी अशोक सराफ यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. या वाढदिवसाचे तसेच चित्रपट सृष्टीतील ५० वर्षांच्या कारकीर्दीचे औचित्य साधून अशोक सराफ यांना झी मराठी वाहिनीवरील मालिकांनी आमंत्रित केले होते. सोमवार ते बुधवारच्या चला हवा येऊ द्या च्या शोमध्ये अशोक सराफ यांना आमंत्रित केले होते. त्यावेळी त्यांच्या ५० वर्षांच्या चित्रपटातील कारकिर्दीला उजाळा दिलेला पाहायला मिळाला. यावेळी किशोरी शहाणे, अल्का कुबल, प्रिया बेर्डे, निशिगंधा वाड आणि निवेदिता सराफ यांनीही हजेरी लावली होती. तर दोन दिवसांपूर्वी किचन कल्लाकारच्या मंचावर आल्यानंतर अशोक सराफ यांचा औक्षण करून ७५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी निर्मिती सावंत यांनी प्रशांत दामले यांच्या अनुपस्थितीत महाराजांची जागा घेतली.
तर राजशेफच्या भूमिकेत मधुरा बाचल पाहायला मिळाल्या. अशोक सराफ हे निर्मिती सावंत यांना ए जाडे अशी हाक मारतात. हा किस्सा सांगताना अशोक मामा म्हणतात की निर्मितीचे एवढं मोठं नाव घेईस्तोपर्यंत ती तिथून निघून गेलेली असते. ए जाडे हा शब्द छोटा आहे त्यामुळे मी तिला नेहमी याच नावाने हाक मारतो असे ते म्हणतात. अशोक मामांच्या सोबत निवेदिता सराफ यांनी किचन कल्लाकारमध्ये हजेरी लावून वेगवेगळे पदार्थ बनवले. अशोक सराफ यांचे औक्षण करून त्यांनी ७५ वा वाढदिवस साजरा केला त्यावेळी अशोक सराफ खूपच भावुक झालेले पाहायला मिळाले. माझा असा वाढदिवस कधी साजरा होईल याची मी कधी कल्पनाच केली नव्हती असे ते म्हणाले.यावेळी संकर्षण कऱ्हाडेने अशोक मामांच्या कारकिर्दीचा आढावा घेत एक पत्र वाचून दाखवले.
मामांनी साकारलेल्या आजवरच्या भूमिकांबद्दल संकर्षणने भरभरून कौतुक केले. पांडू हवालदार चित्रपटातला सखाराम हवालदार, अशी ही बनवा बनवी मधील धनंजय माने, धुमधडाका मधील अशोक आणि यदुनाथ जवळकर अशा गाजलेल्या भूमिकांची आठवण या पत्रातून करण्यात आली. तेव्हा अशोक सराफ यांनी एकच ईच्छा व्यक्त केली, की माझ्या या भूमिकांचे रसिक प्रेक्षकांनी नेहमीच कौतुक केले आहे. त्यांच्याचमुळे मी इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे. या भूमिकांमुळे मला वेगळी ओळख मिळाली मला ही नावं द्या, पण फक्त नावं कोणी ठेऊ नका. माझा वाढदिवस असा कधी साजरा होईल याची मी कल्पना केली नव्हती असेही ते भावुक होऊन म्हणाले. दैदिप्यमान कारकिर्दीचा प्रदीर्घ टप्पा ओलांडल्यानंतर कलाकार म्हणून सर्वांच्या लाडक्या मामांचे हे बोल निशब्द करणारे आहेत.