प्रत्येक मालिकेमध्ये विरोधी पात्र असते ही त्या कथानकाची मागणीच असते असे म्हटले जाते. प्रमुख नायक नायिकेप्रमाणे विरोधी भूमीका देखील तेवढ्याच लोकप्रिय होत असतात हे सर्रास आपण चित्रपट, मालिकांमधून पाहत असतो. अशीच एक विरोधी भूमिका होती मन उडू उडू झालं या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेतील. नयनराव कानविंदे हे पात्र अशाच धाटणीने सजलेले पाहायला मिळाले. ही भूमिका अमित परबने त्याच्या सहजसुंदर अभिनयाने चांगलीच वठवली होती. ३ वर्षात जवळपास २५० हुन अधिक ऑडिशन देणाऱ्या अमितला यश मिळाले ते मन उडू उडू झालं या मालिकेमुळे. आपले एमबीएचे शिक्षण पूर्ण करून कार्पोरेट क्षेत्रात त्याने नोकरी स्वीकारली होती.
मात्र अभिनयाची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. नोकरी सांभाळून तो या मालिकेत अभिनयाची आवड जोपासताना दिसला. शलाकाला त्रास देणारा हा नयन प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे गेला. नयन रावांचे पात्र विरोधी जरी असले तरी या भूमिकेने अमितला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यामुळे ही भूमिका त्याच्यासाठी खूप महत्त्वाची ठरली होती. आज याच भूमिकेमुळे अमितला एक सुखद अनुभव आला आहे. नुकतीच अमितने काश्मीर ट्रिप एन्जॉय केली. तेव्हा तो तिथे असल्याची बातमी आर्मी ऑफिसर सुशील यांना कळली. त्यांच्या भेटीचा हा अनुभव सांगताना अमित म्हणतो की, काश्मीरमध्ये सैन्य अधिकारी सुशील यांना भेटणे उत्साहवर्धक होते. सरांना आमची मन उडू उडू झालं ही मालिका खूप आवडायची.
मी काश्मीरमध्ये आहे हे कळताच त्यांनी ताबडतोब माझ्याशी संपर्क साधला. मला आर्मी बेस कॅम्पला भेट देण्याचे आमंत्रण दिले. जिथे आमची कॉफीसोबत अनेक विषयांवर छान चर्चा झाली. त्यांनी मला काश्मिरी शैलीतील हाताने विणलेला भारतीय ध्वज भेट म्हणून दिला. जवानांनी भारत देशासाठी दिलेले आयुष्य, समर्पणाची भावना आणि संघर्षाची कहानी ऐकून मला अक्षरशः अश्रू अनावर झाले. भारतात अनेक लहान मोठे अभिनेते झाले असतील पण खरा नायक “भारतीय सैनिक” हाच आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना, त्यागाला मनापासून सलाम. माझ्या आयुष्यातील हे सर्वोत्कृष्ट क्षण आणि जीवन भराचा अनुभव आहे. मला इथे आणल्याबद्दल आणि काश्मीरमध्ये माझ्या प्रवासाची व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद सुशीलजी.