स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ता मालिकेतील अनिरुद्धचे पात्र नेहमीच प्रेक्षकांच्या टीकेला सामोरे जाताना दिसते. पत्नी, मुलं असूनही पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन हा अनिरुद्ध संजना सोबत दुसरा संसार थाटतो. त्यामुळे ह्या पात्राला नेहमीच शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे पात्र साकारले आहे अभिनेते मिलिंद गवळी यांनी. मिलिंद यांनी मराठी सृष्टीत आजवर नायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. आई कुठे काय करते या मालिकेतून ते थोड्याशा विरोधी भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले.
त्यामुळे खलनायकाचा बाज असलेल्या अनिरुद्धला रोज प्रेक्षकांकडून शिव्या खायला मिळतात, अशी एक गमतीशीर पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत येऊ लागली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात की, या घरावर माझंही नाव आहे. दुसऱ्याचा विचार न करणारी आणि दुसऱ्याच्या मनाला लागेल असं बोलणारे काही माणसं असतात, त्यातलाच हा अनिरुद्ध देशमुख. फारच उर्मट, धाकट्या भावाला वाटेल ते बोलणार, त्याच्या मनाला लागेल असं बोलणारा, फक्त चुका दाखवून द्यायच्या, मदत करायची नाही. अशी असंख्य माणसं असतात अनिरुद्ध सारखी या आपल्या समाजा मध्ये, बोलताना समोरच्याच्या मनाचा अजिबात विचार करायचा नाही. त्याची काय अडचण आहे ते समजून घ्यायचं ना, आपण किती शहाणे आहोत आणि बाकीच्यांना काहीच कळत नाही असं आयुष्यभर वावरत राहायचं. मला ही अशी माणसं बरीच भेटली, आपण अडकलो असतो. आपल्याला गरज असते म्हणून गप्प बसायच, ऐकून घ्यायचं.
कुणाच्या ना कुणाच्या तरी जवळच असतो. मग आपण बोललो तर आपल्याच जवळच्या माणसांना वाईट वाटेल, या भीतीने आपण उलट उत्तर द्यायची नाहीत. सगळं ऐकून घ्यायचं, पण मनाला खूप त्रास होतो, नको वाटतो त्या माणसाशी आयुष्यात कधीही संबंध ठेवायला. मी तर लांब पळतो अशा माणसांपासून, नको त्यांची तोंड बघायला आणि आपलं तोंड नको त्याला दाखवायला, आपण भले आपलं जग भलं. मी जेव्हा अनिरुद्ध देशमुख ची भूमिका करतो, तेव्हा हीच माणसं माझ्या डोळ्यासमोर असतात. या सिच्युएशनमध्ये ही माणसं कसं बोलतील याचा विचार करतो आणि मग बिनधास्त बोलतो, मग काय.. खातो असंख्य लोकांच्या शिव्या, स्पेशली बायकांच्या. पण शिव्या मिळाल्या की मला आनंद होतो. म्हणजे असल्या लोकांना मला शिव्या देता आल्या नाहीत, तरी माझ्या वतीने लोक अनिरुद्धला नाही तर त्यांना शिव्या देतात असं वाटतं मला.