अभिनेते मिलिंद गवळी यांनी आजवर मराठी चित्रपट तसेच मालिकांमधून उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत. मात्र आई कुठे काय करते या मालिकेतील अनिरुद्धच्या विरोधी भूमिकेने त्यांना एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली आहे. अनिरुद्धच्या वागण्यामुळे आपल्याला लोकांच्या शिव्या खाव्या लागतात हे जाणून असणारे मिलिंद गवळी यांनी पुण्यात झालेल्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात आलेल्या अनुभवामुळे चांगलेच भारावून गेलेले पाहायला मिळाले. याबाबत त्यांनी आईच्या हळदी कुंकवाची देखील एक खास आठवण शेअर केली आहे. मिलिंद गवळी म्हणतात की, स्टार प्रवाह हळदी कुंकू कार्यक्रम पुणे, एक आगळा वेगळा कार्यक्रम. आगळा वेगळा कारण अनिरुद्ध देशमुखला हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला बोलावलं होतं.
अरुंधती आणि संजनाला बोलावलं हे आपण समजू शकतो तो पण अनिरुद्धला! मला तर असं वाटत होतं, हा तर महिलांचा सामूहिक अनिरुद्ध ला शिव्या देण्याचा कार्यक्रम असेल. कार्यक्रमात दीड दोन हजार फक्त महिला. सगळ्याच अतिशय सुंदर नटलेल्या, लोकमत सखी मंचच्या सदस्य. संजना आणि अरुंधती ला बघून सगळ्याच भारावून गेलेल्या. त्या अनिरुद्ध बद्दल काय वाटत होतं देव जाणे. मी त्यांचं मन ओळखायचा प्रयत्न केला आणि भाषणांमध्ये त्यांना म्हणालो, आता मी इथे आलोच आहे तर करा मन मोकळं घाला अनिरुद्धला शिव्या, मी थोडावेळ या कार्यक्रमात आहे तोपर्यंत मनातली भडास मोकळी करा. पण सगळे हसल्या बिचार्या, हा कार्यक्रम आगळावेगळा आणखीन एका गोष्टीसाठी होता, स्पर्धेमध्युन तीन बायका निवडल्या होत्या.
त्यांची फायनल परीक्षा होती अनिरुद्ध देशमुखला लग्नाची मागणी घालणे. म्हणजे नक्कीच त्यांना वाटलं असेल की आपण “खतरो के खिलाडी” या कार्यक्रमात आहोत की काय. अनिरुद्ध देशमुखला प्रपोज करायचं आणि त्या जिगरबाज बायकांनी हिम्मत दाखवून त्यांच्या घरी त्यांना किती शिव्या पडतील याचा विचार न करता केलं प्रपोज. सगळ्यांना हे बघून खूपच गंमत वाटली मजा आली. सगळ्याच महिला टाळ्या वाजवत, हसत होत्या. एकमेव व्यक्ती अतिशय घाबरला होता ,ज्याला काही सुचत नव्हतं ,सुधरत नव्हतं आणि तो होता अनिरुद्ध देशमुख, अर्थात मीच. त्या स्टेजवरच माझ्या मनात, अनेक विचार घोळत होते. एक विचार माझ्या आईचा होता, जिचा १३ वा स्मृतिदिन दोन तारखेला, म्हणजेच त्याच दिवशी होता.
या दीड दोन हजार माऊल्यांच्या रूपात ती मला आशीर्वाद देत आहे असं मला वाटत होतं. एक विचार असा हि आला, की पूर्वीच्या काळात मुलींनी एकदाही न बघता आई वडील जे ठरवून देतील त्या व्यक्तीशी लग्न केलं. माझ्या आईने सुद्धा माझ्या वडिलांना एकदाच लग्नाच्या आधी दुरून पाहिलं होतं आणि ४२ वर्ष सुखाचा संसार केला. तिचं नशीब चांगलं म्हणून वडिलांसारखा एक सज्जन माणूस तिच्या नशिबात आला. पण अशा किती असंख्य महिला असतील दुर्दैवाने त्यांच्या नशिबी हे अनिरुद्ध आला असेल. ज्या वेळेला आमच्या घरी आई हळदी कुंकू करायची, मी घरातून पिक्चर बघायला निघून जायचं, हळदीकुंकू संपलं की मग घरी परत यायचो. आईच्या स्मृतीदिनाच्या दिवशी हळदीकुंकाला मला आज घरातच थांबून घेतलं. “आई कुठे काय करेल” सांगता येत नाही.