विनोदाचा अजरामर बादशहा लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने लाखो प्रेक्षकांची मनं जिंकली. अशोक मामा सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीने मराठी चित्रपट सृष्टीचा पडता काळ उचलण्यास भरीव योगदान दिले, हे मराठी प्रेक्षक कदापि विसरू शकणार नाही. विनोदी भूमीका असो वा गंभीर, लक्ष्मीकांत बेर्डे प्रत्येक भूमिकेत चपखल बसलेले पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांचा मुलगा अभिनय मराठी चित्रपटातून स्थिरस्थावर झालेला पाहायला मिळतो आहे. ती सध्या काय करते, अशी ही आशिकी, रंपाट चित्रपटानंतर पुन्हा प्रमुख भूमिकेत झळकताना दिसणार आहे.
४ नोव्हेंबर रोजी मन कस्तुरी रे हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तेजस्वी प्रकाश या चित्रपटातून अभिनय बेर्डे सोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तेजस्वीचा हा पहिलाच मराठी चित्रपट असणार आहे. अभिनयसाठी नावाजलेल्या अभिनेत्री सोबतच हा चित्रपट तेवढाच महत्वाचा ठरणार आहे. नुकतेच झी मराठीवरील डान्स महाराष्ट्र डान्स या रिऍलिटी शोमध्ये अभिनयने एक धमाल परफॉर्मन्स सादर केला. यावेळी तो खूपच भावुक होताना दिसला. मंचावर बाबांचा विषय निघाला त्यावेळी अभिनयने त्याच्या बाबांना एक फोन केला. बाबा तुम्ही मला सांगायचात, मला आठवतंय. भूमिका कुठलीही असो, हजार टेन्शन घेऊन आलेला प्रेक्षक आपलं नाटक बघून घरी जाताना खिशात नाटकाच्या तिकिटाबरोबर मन भरून लाफ्टर घेऊन गेला पाहिजे.
पंच बोललेल्या वाक्यात नाही, न बोललेल्या दोन वाक्यांमधल्या टायमिंगवर पुरतो, अभिनय ते टायमिंग ओळख. अभिनय प्रेक्षकांचा झाला पाहिजे तर प्रेक्षक अभिनयाचे होतील. बाबा आज कळतंय तुमचं वाक्य. एक काळ होता जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा अभिनय अख्या महाराष्ट्राने लक्षात ठेवला होता. बाबा प्रॉमिस करतो लक्ष्मीकांत बेर्डेचा हा अभिनय उद्याही महाराष्ट्र लक्षात ठेवेल! आय लव्ह यु बाबा. असे म्हणताच मंचावर उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. गश्मीर महाजनी, सोनाली कुलकर्णी यांनी अभिनयला प्रोत्साहित करण्यासाठी टाळ्या देखील वाजवल्या. अभिनय आणि स्वानंदी ही लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलं. हे दोघेही खूप लहान असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे त्यांना सोडून गेले होते.
जेवढे क्षण त्यांनी आपल्या बाबांसोबत अनुभवले होते, ते क्षण आठवताना अभिनय गहिवरून जाताना दिसला. या आठवणी अत्तराच्या कुपिसारख्या मनात कायम साठवून ठेवलेल्या आहेत. अभिनयचा पहिला चित्रपट रिलीज झाला त्यावेळी तो चला हवा येऊ द्या च्या मंचावर आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. तेव्हाही त्याने आपल्या बाबांना फोन लावून म्हटले होते की, माझा पहिला चित्रपट रिलीज होतोय आणि आज तुम्ही नाही आहात मला सांगायला की माझं कुठं काय चुकतंय. मला मार्गदर्शन करायला तुम्ही इथे हवे होतात. एक कलाकार म्हणून तुम्ही खूप ग्रेट आहात. कारण तुमच्या केवळ नसण्याने आजही कितीतरी प्रेक्षक भावुक होतात.