अभिजित बिचुकले यांचा आज १० जानेवारी रोजी पुण्यात अपघात झाला आहे. आपल्या चार मित्रांसह ते गाडीने प्रवास करत असताना हा अपघात घडला. अभिजित बिचुकले यांना या अपघातात डोक्याला दुखापत झाली आहे. तर त्यांच्या सोबत असलेल्या अन्य चार साथीदारांना देखील किरकोळ दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. अपघातात डोक्याला मार लागल्यामुळे अभिजित यांना नजीकच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी तसेच मित्र मंडळींनी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
किरकोळ मार लागल्याने मी सुखरूप आहे आणि जखम लवकरच बारी होईल अशी दिलासादायक माहिती त्यांनी दिली आहे. अभिजित बिचुकले काही कामानिमित्त पुण्याला जात होते त्यांच्याबरोबर आणखी चार मित्र या प्रवासात त्यांच्या सोबत होते. अभिजित बिचुकले यांचे पुण्यात कंदी पेढ्यांचे दुकान आहे. लोकांकडून या दुकानाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांनी दुसरे दुकान थाटले होते. सातारचे कंदी पेढे पुणेकरांना सुद्धा चाखता यावेत म्हणून त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. यानिमित्ताने अभिजित बिचुकले यांचे पुण्यात येणे जाणे चालू असते. मुख्यमंत्री ते पंतप्रधान पदाचे दावेदार अशी बिचुकले यांची राजकीय वर्तुळात ओळख आहे. आपल्या बेताल वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत राहिले आहेत.
मराठी बिग बॉसच्या शोमध्ये याच कारणामुळे आमंत्रित करण्यात आले होते. शोमध्ये त्यांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. अभिजित बिचुकले यांनी शो गाजवल्यानंतर हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनमध्ये आमंत्रित केले होते. वाईल्डकार्ड एन्ट्री करणाऱ्या बिचुकले यांनी हिंदी बिग बॉस सुद्धा गाजवले. मात्र सलमान खान सोबत वाद झाल्याने त्यांना घर सोडावे लागले होते. शोमधुन बाहेर पडल्यानंतरही बिचुकले यांनी सलमानलाच चॅलेंज केले होते. अशा वेगवेगळ्या आव्हानात्मक गोष्टींसाठी अभिजित बुचुकले कायम चर्चेत राहिले आहेत. मात्र आज त्यांच्या अपघाताचे वृत्त समोर येताच अनेकांनी यांच्या बद्दल काळजी व्यक्त केली आहे. मात्र अपघात मोठा नसल्याने फक्त डोक्याला मार लागला आहे. यातून मी लवकरच बरा होईल असेही त्यांनी म्हटले आहे.