झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणूनच गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला. गृहिणींसाठी हा कार्यक्रम म्हणजे एक मोठी पर्वणीच समजली जायची. या कार्यक्रमात अनेक गृहिणींनी सहभागी होऊन आपल्या रेसिपीज छोट्या पडद्यावर शेअर केल्या होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वेगवेगळ्या कलाकारांकडे सुपूर्त करण्यात आले होते. प्रशांत दामले, संकर्षण कऱ्हाडे, देवव्रत जातेगावकर, मृणाल दुसानिस, राणी गुणाजी अशा नामवंत कलाकारांनी सूत्रसंचालनाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.
मागील काळात मात्र कलाकारांना कुठेही जाता आले नाही, त्यामुळे कार्यक्रमाचे प्रसारण थांबवण्यात आले होते. आता आम्ही सारे खवय्ये एका वेगळ्या रूपातून प्रेक्षकांच्या भेटीस यायला सज्ज झालेला आहे. २६ सप्टेंबरपासून दुपारी २.३० वाजता ‘आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी’ कार्यक्रम प्रसारित केला जात आहे. याची खासियत अशी की प्रशांत दामले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांच्या जोडीला संकर्षण कऱ्हाडे हा देखील त्यांच्यासोबत एकत्रित सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे. पिठलं म्हटलं की भाकरी आलीच पाहिजे, वडा म्हटलं की पाव असलाच पाहिजे म्हणजे थोडक्यात जोडीनेच गोडी वाढते. असे म्हणत हा शो प्रशांत दामले आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या जोडी शिवाय अपूर्णच ठरेल.
प्रेक्षकांच्या याच आग्रहाखातर संकर्षण आणि प्रशांत दामले पुन्हा एकदा एकत्र येऊन नवनवीन पदार्थांची चव चाखणार आहेत. झी मराठीवरील किचन कल्लाकार या शो नंतर ही जोडी पुन्हा एकदा नव्या रुपात प्रेक्षकांच्या समोर दाखल होत आहे. काही दिवसांपूर्वीच संकर्षण कऱ्हाडे लंडनच्या दौऱ्यावर गेला होता. एक नवीन प्रोजेक्ट नवा चित्रपट करत असल्याने काही दिवस त्याचा तिथेच मुक्काम होता. मात्र आता मुंबई, परभणीची खूप आठवण येतीये असे म्हणत त्याने एक पोस्ट लिहिली होती. लंडनच्या दौऱ्याहून तो पुन्हा लवकरच भारतात परतणार आहे. झी मराठी वाहिनीवरील आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात रुजू होणार आहे.
संकर्षण कऱ्हाडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होता त्यावेळी त्याला विविध गावांमध्ये, शहरांमध्ये भेट द्यावी लागायची. गृहिणींना बोलतं करून तो त्यांच्याकडून वेगवेगळ्या रेसिपीज बनवून घ्यायचा. अर्थात गृहिणींना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ही नामी संधी चालून आलेली असायची. त्यामुळे लहान मुलांपासून ते अगदी प्रौढांपर्यंत या कार्यक्रमाचे चाहते बनले होते. गेल्या दोन वर्षांपासून हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याने प्रेक्षकांनी काहीशी नाराजी दर्शवली होती. परंतु ही नाराजी आता लवकरच दूर होत असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.