दिवाळीच्या सुट्टीत फिरण्यासाठी अनेकजण कोकणासारख्या निसर्गरम्य ठिकाणाची निवड करतात. मात्र अशावेळी हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग करून अनेकांना गंडा घातला जात असल्याचे चित्र आता समोर येत आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर यांच्या नवऱ्याने आणि मुलीने दिवाळीची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गणपतीपुळे येथील ग्रीनलीफ रिसोर्ट हॉटेलचे ऑनलाईन पद्धतीने बुकींग केले होते. दिवाळीत दोन दिवसांसाठी त्यांनी १७ हजार रुपये देऊन या रिसॉर्टचे बुकींग केले होते. मात्र तिथे गेल्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. प्रमोद प्रभुलकर यांनी ग्रीनलीफ रिसॉर्टमध्ये बुकींग केल्यानंतर त्या ठिकाणी ते राहण्यासाठी गेले होते.
मात्र तिकडे गेल्यानंतर त्यांच्या नावाने कुठलेच बुकींग झाले नसल्याचे त्यांच्या समोर आले. यानंतर त्यांनी हॉटेलच्या मॅनेजमेंटकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली असा आरोप प्रमोद प्रभुलकर यांनी केला आहे. खरं तर हे रिसॉर्ट ४ स्टार दर्जाचे असून ते शिवसेना नेते रविंद्र फाटक यांचे असल्याचे बोललं जात आहे. एका नेत्याच्या रिसॉर्टमध्ये फसवणूक झाल्याने प्रमोद प्रभुळकर यांना मोठा धक्का बसला आहे. एवढेच नाही तर ऑनलाइन हॉटेलचे बुकिंग करणाऱ्या प्रत्येकालाच हा अनुभव आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एका जणाची १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे म्हटले आहे. हॉटेलच्या मॅनेजमेंटकडून असा घोळ होणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुळात ही सिस्टीम हॅक करण्यात आली असल्याची कारण तिथली मॅनेजमेंट टीम देत आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार करण्याची मागणी फसवणूक दारांनी केली आहे. मात्र ह्या रिसॉर्टमध्ये मी गेले नव्हते असे मधुराणी प्रभुलकर यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना काही वृत्तमाध्यमांचा निषेध देखील नोंदवला आहे. त्या म्हणतात की, गेले ५ महिने मी जाणीपूर्वक ऑनलाईन कार्यरत नाही. पण काही गोष्टींचा खुलासा करण्यासाठी मी ही गोष्ट लिहिते आहे. कालपासून मधुराणी प्रभुलकर ह्यांना हजारोंचा गंडा, मधुराणी प्रभुलकर ह्यांची फसवणुक. अशा बातम्या काही नामांकित वृत्तपत्रांच्या पोर्टल्स वर येत आहेत. पण वास्तवात त्यात नमूद केलेल्या गणपतीपुळे येथील हॉटेल मध्ये मी स्वतः गेलेलेच नाही.
माझी एक छोटी सर्जरी झाली असल्याकारणाने मालिकेतूनही काही दिवसांची रजा घेऊन मी पुण्यातील घरी विश्रांती घेत आहे. आता माझी तब्येत बरीच बरी आहे. लवकरच मी मालिकेतून आपल्याला पुन्हा भेटेन. गणपतीपुळ्यातील हॉटेल मध्ये माझी लेक स्वराली आणि प्रमोद दोघच गेले आहेत. तिथे त्यांच्याबरोबर जे घडले ते अत्यंत चूक आहे. काल ह्या सगळ्या मनस्तापामुळे प्रमोदची तब्येत सुद्धा बिघडली आहे. पण दोघे सुखरूप आहेत; त्यांच्याप्रमाणे इतर सुद्धा अनेक जण फसवले गेले आहेत. ह्याचा लवकरात लवकर तपास लागायला हवा; सगळ्यांचे पैसे परत मिळायला हवेत. मला आज सकाळासून शेकडो मेसेजेस व फोन येत आहेत. पत्रकारांनी नीट माहिती न घेता चुकीची हेडलाईन छापली आहे. ह्या बेजबाबदारपणाचा खेद आणि निषेध, असे म्हणत मधुराणी प्रभुलकर यांनी संताप व्यक्त केला आहे.